Breaking News
मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार
पुणे ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे ‘विश्व मराठी संमेलन 2025’चे उद्घाटन शुक्रवारी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानासाठी ‘साहित्य भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले विश्व मराठी संमेलन असून, ‘अभिजात मराठी‘ हीच या संमेलनाची संकल्पना आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे या कवी संमेलनात बेळगाव-निपाणी येथील कवी आपल्या काव्यपाठाने रंगत आणणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच, अभिजात पाठपुरावा समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण या सोहळ्यात करण्यात आले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध स्टॉल्सवर भेट दिली. भाषा ही केवळ संपर्काचे साधन नाही, तर अभिव्यक्तीच्या माध्यमातून सृजन निर्मितीचे देखील साधन आहे. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा राजमान्यता प्राप्त आहे. परंतु, मराठीला राजमान्यता देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मराठी भाषा प्रत्येक किलोमीटरवर बदलत असली तरी तिची गोडी अवीट आहे. मराठीतील बोलीभाषा आणि तिच्यातील साहित्य, काव्यप्रकार हे अतिशय वेगळे आणि मनाला भावणारे आहेत असे फडणवीस म्हणाले. मराठी भाषेची ही गौरवमयी परंपरा पुढे नेण्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही जगभरातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करीत असल्याचे ते म्हणाले.
पुण्यात 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत असे तीन दिवसीय साहित्य संमेलन सुरु असणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मराठी विभागाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून पुढील पिढ्यांसाठी अभिजात साहित्य कसे उपलब्ध करता येईल, याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर येत्या 5 वर्षांत कोणत्याही एका देशात मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाईल, लंडनमधील मराठी मंडळाला जागेसंदर्भात मदत केली जाईल आणि दिल्लीतील मराठी शाळा अव्याहत चालण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, अभिजात पाठपुरावा समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण या सोहळ्यात करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai