Breaking News
राष्ट्रवादी शरद पवार गटाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई ः देशात ईव्हीएमद्वारे होत असलेल्या निवडणुकांच्या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेत शंका आहे. त्यामुळे जरी निवडणूक आयोगाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम वर घ्यायच्या असल्यातरी निदान 30% निवडणुका ह्या मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थिती होते.
हरियाणा व महाराष्ट्र राज्याच्या निकालानंतर ईव्हीएम मशिनद्वारे निवडणुका घेण्याविरोधात अनेक सामाजिक संघटना आवाज उठवू लागल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हे अपेक्षेपेक्षा विपरीत लागल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हरियाणा निकालानंतर 30 हून अधिक तर महाराष्ट्रात 100 हून अधिक निवडणुक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातच निवडणुक आयोगाने फेरमतमोजणी करण्याची जाहीर केलेली कार्यप्रणाली वादात सापडली आहे. फेरमतमोजणी ही ईव्हीएम मशीनमधील तपशील नष्ट करुन होणार असल्याने ईव्हीएमवरील संशय अधिक बळावला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमच्या बाजुने अनेक निकाल दिल्याने ईव्हीएमद्वारेच निवडणुका होणार हे निश्चित आहे.
ही सर्व पार्श्वभुमी पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने 27 जानेवारी रोजी राज्य निवडणुक अधिकारी यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या निवेदनात ईव्हीएम मशिन सोबत किमान 30 टक्के मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची सूचना केली आहे. यामुळे राज्यात मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान व ईव्हीएम मशिनद्वारे होणारे मतदान हे मतदारांचा कौल स्पष्ट करेल असे नमुद केले आहे. हरियाणा व महाराष्ट्र राज्यात पोस्टल मतपत्रिकेद्वारे दिसणारा मतदारांचा कौल व ईव्हीएम मशिनद्वारे आलेला कौल हा पुर्णतः भिन्न असल्याचे निवेदनात म्हटंले आहे. यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 59 व कलम 61(अ) चा संदर्भ आपल्या निवेदनात दिला आहे. लोकप्रतिनिधी कायदा कलम 59 नुसार लोकसभा व विधानसभा निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घेणे बंधनकारक आहे तर कलम 61(अ) नुसार यांत्रिक मशिनद्वारे मतदान करणे हे सरसकट नसून ऐच्छिक आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने राज्य निवडणुक आयोगाकडे केली आहे. राज्य निवडणुक आयोग यास कसा प्रतिसाद देते यावर आपली पुढील भुमिका ठरेल असे शिष्टमंडळातील प्रतिनिधी राजीव मिश्रा यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना दिली आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण, जि.एस.पाटील, राजा राजापुरकर, काँग्रेस पक्षाचे तुकाराम कदम तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रविण म्हात्रे व आनंद दुभेंसह सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांचा समावेश होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai