Breaking News
शिक्षण हीच बहुजन समाजाच्या उद्धाराची नाडी आहे हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अतिशय निष्ठेने, त्यागाने, ध्येयवादाने आपलं सारं आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी वेचलं. शिक्षण व समाज परिवर्तन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून परस्पर पूरक आहेत. शिक्षणानेच समाजाचे परिवर्तन, अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, विषमता दूर होणार यावर त्यांचा ठाम विश्वास होता. जनतेला अज्ञानाच्या गरजेतून बाहेर काढण्याच्या निर्धाराने त्यांनी शंभर वर्षांपूर्वी एका दलित विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. या कामाला अधिक ठोस रूप देण्यासाठी 1919 मध्ये रयत शिक्षणाची शिक्षण संस्थेची स्थापना केली.
महात्मा फुले, शाहू महाराज व विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी पुढे एक दलित व इतर तीन अशा चार विद्यार्थ्यांनिशी एक वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहाचे नामकरण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते सातारा येथे झाले. कर्मवीरांच्या या क्रांतिकारी प्रयोगाला गांधीजींनी मनापासून दाद दिली. 1928 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्थेला भेट देऊन ही एक अद्वितीय संस्था आहे असे गौरव उद्गार काढले होते. अठरापगड जाती आणि धर्माच्या विद्यार्थ्यांना एकाच छपराखाली एकाच स्वयंपाक गृहात एकत्र नांदण्याची दीक्षा देणार्या अण्णांनी एक नवा माणूस घडवण्याची मूस संस्थेच्या रूपाने निर्माण केली. अण्णा खेडोपाडी अनवणी जायचे. कार्यकर्ते मिळायचे, शाखा निघायची पण यापेक्षा चुणचुणीत मुलं दिसली की त्यांना घेऊन सातार्यातील बोर्डिंगमध्ये दाखल करण्यात त्यांना मोठा आनंद मिळे. ‘कमवा आणि शिका’ हे त्यांच्या बोर्डिंगचे ब्रीद होते. ‘स्वावलंबी शिक्षण’ हे संस्थेचे ब्रीद. ते निरंतर आचरणात आणणारी ही एकमेव शिक्षण संस्था असावी. शिक्षणाबरोबर मुलांनी दोन-तीन तास शारीरिक काम करावं यातूनच श्रमाचे महत्व त्यांच्यावर बिंबवायचे होते. आजही अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या मुलांना छोटीमोठी कामे करून पैशाची जुळवा जुळवा करावी लागते. पण ते केवळ पैशासाठीच करतात असे म्हणायला हवे. पण कर्मवीरांना स्वावलंबनासोबत, स्वाभिमान आणि कणखरपणाही त्यांच्यात रुजवायचा होता.
वसतिगृहानंतर शाळा सुरु केल्या. शिक्षकांची वानवा बघून अध्यापक विद्यालय सुरू केले. प्राथमिक, नंतर माध्यमिक आणि त्यानंतर शेवटी महाविद्यालये सुरू केली. पण हे सगळं ग्रामीण भागातच. त्या काळाची पहिली गरज ही प्राथमिक शिक्षणाची होती हे त्यांनी हे पक्के जाणले होते. या आधी अनेक संस्था (उदा.पुण्यात)शिक्षणाचं काम करीत होत्या. पण त्यांनी शहराची तटबंदी ओलांडली नाही. खेड्यापाड्यातली गोरगरिबांची मुलं उच्चशिक्षित होऊन मुंबई विद्यापीठात इंग्रजी विषय घेऊन सर्व प्रथम येवून गोल्ड मेडल मिळवू शकतात, इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊ शकतात हे कर्मवीरांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. आमटी-भाकरीवर राहणारी, गोणपाटावर झोपणारी शाहू बोर्डिंग मधील एकेकाळची तीन मुलं एकाच वेळी महाराष्ट्रातल्या तीन विद्यापीठांची कुलगुरूपदं भूषवित होती. कै.वसंतदादा हे संस्थेचे काही काळ अध्यक्ष होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी खाजगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांना परवाना देण्याचा निर्णय घेतला. रयत शिक्षण संस्थेला अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये सुरू करता आली असती, नव्हे अनेकांनी तशी मागणीही केली होती. पण अजूनही जिथे शाळा नाही त्या अतिदुर्गम भागात, आदिवासी पाड्यात शाळा काढणे यालाच प्राधान्य संस्था देत आली आहे. यातच संस्थेचे मोठेपण आहे. कारण या कामात शासनाने आपले हात झटकले आहेत.
प्रत्येक गावात शाळा हे कर्मवीरांचे धोरण होतं. संस्थेचं नाव रयत आणि बोधचिन्ह वड या दोन्ही बाबी काना मात्रा वेलांटी नसलेली अक्षरे गावातल्या माणसांचा सरळ आणि साधेपणा प्रतिबिंबित करतात. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ यामधील ‘आमचे’ हा शब्द अनेकवचनी असून संस्थेची सर्वसमावेशकता अभिप्रेत होते. त्यामुळेच अण्णांनंतर सर्व समाजाने या संस्थेचं पालकत्व निभावलेलं आहे. वडाच्या पारंब्याप्रमाणं शाखा वाढत गेल्या. कर्मवीरांनी 1938 साली 61 शाळा काढल्या आणि 1950 पर्यंत शाळांची संख्या झाली 578. इतका त्यांच्या कार्याचा झपाटा होता. आज रयत शिक्षण संस्थेच्या 772 शाखा, 13207 सेवक असून 432621 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेत शिकलेल्या प्रत्येकाला आपल्या मागे असलेल्या समाजाचं आपण काही देणं लागतो याचं बाळकडू दिलं जातं. सामान्य जनतेचं निखळ पाठबळ हीच अण्णांची प्रेरणा. रयत पाठीशी असल्याने कुठलेही ग्रँटसाठी सरकार पुढे त्यांनी मान तुकवली नाही. शरीर आणि मन यांचा संवाद, विकास करणारे ज्ञान मिळवणे, त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचे व्रत अण्णांनी निर्धारणे चालविले. शिक्षण कोणासाठी कसे आणि का असावे याचा स्वच्छ विचार घेऊन अविरत काम करणार्या कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेचे एक प्रतिमान (मॉडेल)महाराष्ट्राला दिले. आपल्या मागे निष्ठावंत कर्त्या माणसांचा एक ताटवा फुलविला म्हणूनच ग्रामीण भागात संस्थेचे काम आजही अविरत विस्तारत आहे. शाखांची संख्या वाढली म्हणून गुणवत्ता घसरली नाही. उलट आज रयत संस्था म्हणजे गुणवत्तेचा मानबिंदू अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये रयतचे विद्यार्थी जगाच्या कानाकोपर्यात आहेत. कर्मवीरांच्या ‘रयत’ मध्ये आहोत ही जाणीवच शिक्षकाला व कर्मचार्याला केवळ पाट्या टाकण्यापासून रोखत असते. संस्थेत नोकरी करणारे सगळेच ‘रयत सेवक’ हे बिरुद सार्थपणे आपल्या छातीवर मिरवतात. समाजातील लोकांचे दुरवस्थेचे व दुःखाचे मूळ बहुतांशी त्यांच्या अज्ञानात आहे हे ओळखून भाऊरावांनी त्या काळातला कोणताही महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आपल्या नजरेतून सुटू दिला नाही. आज शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या वाढत्या रेट्यांमुळे गोरं गरिबांना शिक्षणाची दारे बंद होत आहेत. म. फुले, कर्मवीर अण्णा यांच्या सक्तीचं आणि मोफत शिक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर 63 वर्षे जावी लागली. रंजल्या गांजलेल्यांना शिक्षणाची समान संधी, स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, लोकाभिमुखता, जात -संप्रदाय निरपेक्षता, संस्थात्मक आत्मनिर्भरता या कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वांची प्रस्तुतता आजच्या काळात नि:संशय अधिक तीव्रतेने जाणवते.खरे म्हणजे यातच कर्मवीरांच्या दृष्टेपणाचे मर्म सामावलं आहे. पुरोगामी समाज परिवर्तनाचे सत्ता निरपेक्ष विधायक केंद्र म्हणून रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या लोक जीवनात काम करीत आली आहे कर्मवीरांच्या विधायक, जीवनोपयोगी शैक्षणिक कार्यात निरपेक्ष सहभाग देत त्याला गती देणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्यच नाही का असे म्हणावेसे वाटते. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
- डॉ अजित मगदूम
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai