
श्री गणेश हौ.सोसायटीवर लेखापरिक्षणात गंभीर ताशेरे
- by संजयकुमार सुर्वे
- Jul 21, 2023
- 740
विहित मुदतीत खुलासा करण्यासाठी संचालकांना कारणे दाखवा नोटीस
नवी मुंबई ः श्री गणेश हौ.सोसायटीचे विशेष लेखापरिक्षण सह निबंधक सह. संस्था (सिडको) यांच्या 26 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये करण्यात आले. हे लेखापरिक्षण संस्था नोंदणीपासून ते सन 2016 या कालावधीचे केले असून त्यासंबंधी अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात अनेक गंभीर ताशेरे ओढल्याचे संबंधित लेखापरिक्षकांनी स्थापनेपासून 2016 पर्यंत कार्यरत असणाऱ्या सर्व संचालकांना पाठवलेल्या नोटीसीवरुन दिसत आहे. यापुर्वी दोन भागात याचा परामर्ष आजची नवी मुंबईने घेतला असून या भागात लेखापरिक्षणाच्या अहवालातील ताशेऱ्यांचा परामर्ष घेत आहोत.
शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाने 6 फेब्रुवारी 1993 रोजी श्री गणेश सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यास भुखंड वाटप जाहीर केले व सदर संस्थेचे सभासत्व घेण्यासाठी संस्थेला फ्रुट अँड व्हेजिटेबल मर्चंट असो. कडून सभासदत्व प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले होते. परंतु, संस्थेचे मुख्य प्रवर्तक अशोक गावडे यांनी 15.9.1993 रोजी दादर भाजीपाला व्यापारी मित्रमंडळ ही संस्था स्थापन करुन विकासक मयुरेश डेव्हलपर्स यांना 372 सदस्यांची यादी आपल्या संस्थेच्या नावाने दिली. वरील पत्रव्यवहार हा संस्था नोंदणीकृत होण्याच्या आधी केलेला असल्याने बनावट कागदपत्रे तयार करुन तिचा वापर करुन, संगनमताने संस्था, सभासद व शासनाची फसवणुक व विश्वासघात केल्याचा आक्षेप नोंदवून याबाबत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. संस्थेचे दफ्तर विकसकाच्या कार्यालयात ठेवल्याचे व ते गहाळ झाल्याचे संस्थेच्या म्हणण्यावर तीव्र आक्षेप लेखापरिक्षकांनी सदर नोटीसीत बजावले आहेत. त्यात दफ्तरात फेरफार, बदल करणे, दफ्तर गहाळ करणे आणि संस्था व सभासदांची फसवणुक, दिशाभूल, विश्वासघात करणे यासारखे गंभीर आरोपांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त संबधित नोटीसीमध्ये लेखापरिक्षकांनी 18 गंभीर दोष नोंदवले आहेत. संस्था उपविधी नियमांनुसार इमारत व मालमत्तेचा विमा न उतरवणे, इमारत निधी विनियोगाचे उल्लंघन करणे, थकबाकी वसुलीसाठी कार्यवाही न करणे, दोषदुरुस्ती अहवाल न पाठवणे, महसुली खर्च भांडवली खर्च म्हणून दर्शवणे, बचत खात्यातील रक्कम मुदत ठेवीत न गुंतवल्याने संस्थेचे नुकसान होणे, आयकर विवरण पत्र दाखल न करणे, टीडीएस कपात न करणे, इमारत दुरुस्तीसाठी 1 लाखांपेक्षा जास्त खर्चास वार्षिक सभेची मान्यता न घेणे, इमारत दुरुस्तीच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता तसेच सादर केलेले बिल व झालेले काम याबाबत खातरजमा करण्यासाठी सल्लागार न नेमणे, आय व जे नोंदवहीत सभेद शाई लावून खाडाखोड करणे व नोंदी अपुर्ण ठेवणे, सभासद भाग नोंदवही नाही, सभासद संख्या प्रत्येक रजिस्टरमध्ये वेगवेगळी आहे, सभासद संख्या कमी होऊन सभासदांचे वर्ग बदलणे, सिडको सोबत अँग्रीमेंट टु लिज न करणे, नवीन सभासद करताना व सदनिका हस्तांतरीत करताना सिडकोची मोजणी नाही, संस्था व विकासक यांच्यातील करारास सिडकोची मंजुरी नाही, तसेच संस्था व विकासक यांच्यातील करार नोंदणीकृत न केल्याने शासनाचा महसूल बुडणे यासारखे गंभीर आरोप सदर नोटीसत लेखापरिक्षकाने केले असून त्यामुळे संस्थेचे, सभासदांचे व शासनाचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका संबंधित संचाकांवर ठेवून सदर रक्कमा वसूलपात्र असल्याचे म्हटले आहे.
वरील आक्षेपांबाबत विहित मुदतीत खुलासा मागवणारी नोटीस विशेष लेखापरिक्षक वर्ग 2 सहकारी संस्था (प्रक्रिया) ठाणे यांनी श्री गणेश हौ. सोसायटीच्या सभासदांना बजावली आहे. विहित मुदतीत खुलासा न केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची सूचना सर्व समिती सदस्यांना देण्यात आली आहे. वरील संस्थेचे समिती सदस्य याबाबत कोणता खुलासा करतात याकडे तमाम नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे