Breaking News
स्वयंविकासावर सभासदांचा भर, तर विकासकांसाठी नेते आग्रही
नवी मुंबई ः नवी मुंबईत सिडको निर्मित धोकादायक इमारतींचे पुनर्विकासाचे वारे जोरदार सुरु असताना आता 30 वर्षे पुर्ण झालेल्या खाजगी इमारतींनाही पुनर्विकासाचे डोहाळे लागले आहेत. परंतु, या डोहाळे जेवणाचे आमंत्रण कोणाला द्यावे यावरुन गृहनिर्माण संस्थेचे सभासद आणि स्थानिक राजकर्ते यांच्यात मतभेद झाले आहेत. संस्थेचे सभासद पुनर्विकास स्वतः करण्याच्या मताचे आहेत तर तेथे राहणारे राजकर्ते हे खाजगी विकासकामार्फत पुनर्विकास करण्याच्या बाजुने असल्याने पुनर्विकासाचे घोंगडे भिजत पडले आहे.
नवी मुंबईत सध्या प्रत्येक नोडमध्ये पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. नवी मुंबईत भुखंडाचे मुल्य गगनाला भिडल्याने विकासकांनी पुनर्विकासाचे माध्यम निवडले आहे. विकासकाला जमिनीचे मुल्य द्यावे (पान 7 वर)
लागत नसल्याने आणि स्थानिक राजकर्त्याला हाताशी धरल्यास पुनर्विकासाचा मार्ग विकासकाला आवडू लागला आहे. आतापर्यंत सिडको निर्मित धोकादायक घरे बांधण्यासाठी पुनर्विकासाचे प्रस्ताव महापालिकेकडे येत होते. या पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठा आर्थिक लाभ होत असल्याने बहुतांश राजकर्त्यांनी आपल्या मजतील विकासक गृहनिर्माण संस्थांवर थोपवण्यास सुरुवात केली आहे. सदर विकासक न निवडल्यास महापालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव रोखून धरणे किंवा संबंधित गृहनिर्माण संस्थेत वेगळा गट तयार करुन वादविवाद करण्याची रणनिती राजकर्त्यांनी अवलंबली आहे.
सध्या कोपरखैरणे येथील कलश उद्यान गृहसंकुलाच्या पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नियमाप्रमाणे 30 वर्षे पुर्ण झालेल्या व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याचे धोरण एकात्मिक बांधकाम व प्रोत्साहनात्मक नियमावली 2020 मध्ये आहे. कलश उद्यान गृहनिर्माण संकुलास 30 वर्षे पुर्ण झाल्याने त्याच्या पुनर्विकासाचा घाट स्थानिक नेत्यांनी घातला आहे. स्थानिक वेगवेगळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांनी आपापल्या विकासकाचे नाव पुढे केले असून सभासदांनी मात्र स्वयंविकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुनर्विकासाच्या डोहाळे जेवणाला आमंत्रण मिळणार नसल्याने स्थानिक नेत्यांनी अनेक अडचणी त्यांना विरोध करणाऱ्या सदस्यांपुढे निर्माण केल्याचे बोलले जाते. स्थानिक नेत्यांच्या राजकीय दांडगाईपुढे कलश उद्यान गृहसंकुलाचे पुनर्विकास लांबते काय याची भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया आजची नवी मुंबईशी बोलताने अनेक सभासदांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे