Breaking News
विजय चौगुले गटाचे बारा नगरसेवक भाजपच्या वाटेवर
नवी मुंबई ः राज्यातील आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे गणेश नाईक यांनी शिंदे सेनेचे 12 माजी नगरसेवक गळाला लावले असल्याची चर्चा नवी मुंबईत असून निवडणुका जाहीर होईपर्यंत त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आल्याचे बोलले जात आहे. हे माजी नगरसेवक चौगुले यांची पक्षातील मनमानी आणि घराणेशाही याला टार्गेट करुन पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. शिंदे यांना ही कुणकुण लागल्याने त्यांनी नाराजांसोबत बैठका सुरु केल्या आहेत.
मागील राज्यातील सत्तांतरात मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास विरोध केल्याची चर्चा होती. त्यामुळे गणेश नाईक व त्यांच्या समर्थकांमध्ये एकनाथ शिंदेंविषयी प्रचंड राग आहे. मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे असताना त्यांच्या नगरविकास विभागाच्या कारभारावर नवी मुंबईच्या विकास आराखड्यावरुन टिकेची झोड नाईक यांनी उठवली होती. श्रीकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुक सोयीची जावी म्हणून कल्याण महापालिका क्षेत्रातील 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करुन नाईकांना डिवचण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाईकांनी दमदार विजय मिळवून मंत्रिमंडळात जोरदार वापसी केली आहे. शिंदे यांचा गड असणाऱ्या ठाण्यातच जनता दरबार भरवून त्यांची राजकीय गोची करण्याचा प्रयत्न नाईकांनी केला आहे. नाईकांच्या आक्रमकतेला फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. शिंदे यांना ठाण्यात घेरल्यानंतर नाईकांनी आता मोर्चा नवी मुंबईत वळवला आहे. शिंदेसेनेचे 12 माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लावले असून पालिका निवडणुका जाहीर होईपर्यंत त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. शिंदेसेनेचे नेते विजय चौगुले यांच्या जवळच्या नगरसेवकांना नाईकांनी लक्ष केल्याने त्याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नाराज नगरसेवकांनी चौगुले यांच्या मनमानी कारभाराचा तसेच त्यांच्या मुलांचा व भाच्यांचा एमआयडीसी क्षेत्रातील अनागोंदी कारभाराचा पाढा त्यांनी शिंदे यांच्यासमोर वाचला. शिंदे यांनी नाराजांना महापालिका, खाजगी विकासकांकडे कामे देण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्यास नाराज नगरसेवक कसा प्रतिसाद देतात त्यावर शिंदेसेनेचे नवी मुंबईतील भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक रमाकांत म्हात्रे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने शिंदे सेनेची बाजु वरचढ झाल्याचे चित्र होते. परंतु, नाईकांच्या खेळीने शिंदेंना मोठा दणका ऐरोली विधानसभा मतदार संघात बसणार असल्याचे बोलले जात आहे.
ऐरोली मतदारसंघात शिंदे सेनेचे प्राबल्य असून भाजपने ऐरोली, घणसोली व पावणे, तुर्भे येथील काही माजी नगरसेवकांना चुचकारले असून त्यांना पक्षात पदे व आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे. आगामी निवडणुकीपुव एकनाथ शिंदे यांचेकडून जे काही मिळेल ते घेऊन पक्षांतर करण्याचे धोरण या नाराज नगरसेवकांनी आखले आहे. याबाबत शिवसेनेचे नेते चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षात कोणतीही नाराजी नसून आम्ही स्वबळावर महापालिका निवडणुक लढवून 1998 साली शिवसेनेचा भगवा महापालिकेवरुन उतरवणाऱ्यांना धडा शिकवू असे सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai