Breaking News
3500 प्रकल्प कारवाईच्या फेऱ्यात
मुंबई : महारेरा प्राधिकरणाने गेल्या महिन्यात व्यपगत प्रकल्पांना दिलेल्या नोटिसांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नोटिस बजावण्यात आलेल्या दहा हजार 773 प्रकल्पांपैकी पाच हजार 324 प्रकल्पांतील विकासकांनी नोटिसांना उत्तरे देऊन त्यानुसार कार्यवाही केली आहे. काहीही प्रतिसाद न देणाऱ्या तीन हजार 499 प्रकल्पांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर 1950 प्रकल्पांना स्थगितीची कारवाई करण्यात येऊन बँक खाते गोठवण्यात आले आहे.
महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी प्रकल्पपूर्ततेची दिलेली तारीख उलटून गेली तरी कुठलीही माहिती अद्ययावत न करणाऱ्या दहा हजार 773 प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिस बजावल्या होत्या. या प्रकल्पांना अपेक्षित माहिती अद्ययावत करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. यापैकी प्रतिसाद दिलेल्या गृहप्रकल्पांतील तीन हजार 517 प्रकल्पांनी भोगवटा प्रमाणपत्र सादर केले आहे. 524 प्रकल्पांनी प्रकल्पांच्या मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत. 1283 प्रकल्पांच्या प्रतिसादाची छाननी सुरू आहे. 1950 प्रकल्पांना स्थगितीची कारवाई करण्यात येऊन बँक खाते गोठवण्यात आले आहे. प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.
महारेरा नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक विकासकाला प्रकल्प प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याची तारीख आपल्या प्रस्तावात स्पष्टपणे नोंदवावी लागते. या घोषित प्रकल्प पूर्ततेच्या तारखेनंतर प्रकल्प पूर्ण झालेला असेल तर भोगवटा प्रमाणपत्रासह, प्रपत्र चार सादर करावे लागते. प्रकल्प अपूर्ण असेल तर मुदतवाढीसाठी प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे किंवा प्रकल्प सुरू करण्यात काही अडचणी असल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक विकासकाला तिमाही /वार्षिक असे कालबद्ध रीतीने विहित विवरण प्रपत्रे संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. अशी कारवाई पूरक कागदपत्रांसह करणे अपेक्षित आहे. विहित मुदतीत नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्याचे महारेराने ठरविले आहे. या अंतर्गत अशा प्रकल्पाची थेट नोंदणी रद्द करणे किंवा स्थगित करणे, प्रकल्पावर दंडात्मक कारवाई आणि या प्रकल्पातील सदनिकेच्या खरेदी-विक्री व्यवहाराची नोंदणी न करण्याच्या सूचना सह जिल्हा निबंधकांना देणे, प्रकल्पाचे बँक खाते गोठवणे अशा प्रकारची कारवाई महारेराकडून केली जाते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai