Breaking News
मुंबई : राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्याचा मुंबई शहर ग्रंथोत्सव 5 व 6 फेब्रुवारीला आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात झाली.
या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्यवाह उमा नाबर, कार्याध्यक्ष शीतल करदेकर, शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी विजय सावंत, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सुनील कुबल, व अध्यक्ष दिलीप कोरे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळे, मुंबई साहित्य संघाच्या प्रतिनिधी प्रतिभा बिश्वास, मनपा शिक्षक ग्रंथालयाच्या ग्रंथपाल व शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधी साधना कुदळे, पी. पी गायकवाड,सुनिल आग्रे, भगवान परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ दिंडी, चर्चासत्र, परिसंवाद,व्याख्यान, लेखक आपल्या भेटीला असे दर्जेदार, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच साहित्य जगतातील लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदेसाठी स्टॉल उभारले जाणार आहेत. यावेळी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
“आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात वाचनसंस्कृती जोपासण्याची गरज आहे. विशेषत: लहान शाळकरी मुलामुलींमध्ये वाचनसंस्कृती रूजवण्याची आवश्यकता आहे. ई-बुक सुविधाही आता उपलब्ध झाली आहे. काळानुरूप बदलले पाहिजे. प्रत्येकाचे वाचन वाढले पाहिजे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेवून लोकसहभाग वाढवावा. तरुण पिढीसाठी ज्ञानाचा संगम आणि वाचनाची उर्जा मिळावी यासाठी ग्रंथोत्सव हा लोकोत्सव व्हावा, अशा सूचना मान्यवरांनी मांडल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai