Breaking News
मुंबई : मुंबईमधील दादर परिसरात टोरेस नावाच्या कंपनीनं कमी कालावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचं अमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूव उघडकीस आला. या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) एन्ट्री केली आहे. गुरुवारी ईडीने मोठी कारवाई करत मुंबई 10 आणि जयपूरमधील 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात मोठ्या प्रमाणात संशयीत कागदपत्रे, डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. तसेच, मे. प्लाटीनम हेर्न प्रा. लि.(टोरेस ज्वेलरी) आणि त्याच्या सहयोगी संस्थांच्या नावावर असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यात 21 कोटी 75 लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टोरेस कंपनीने तब्बल 1000 कोटींची ही फसवणूक केल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये एक लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात कंपनीशी निगडीत असणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी अटक केलेलं असून ते कोठडीत आहेत. मुंबई आणि आसपासच्या एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचं आश्वासन या टोरेस कंपनीने दिलं होतं. दरम्यान, मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता ईडीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत या घोटाळ्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (23 जानेवारी) टोरेस ज्वेलरी फसवणुकीच्या संबंधित मुंबई आणि जयपूरमधील विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. त्याबाबत ईडी तपास करीत आहे.
याप्रकरणी नुकतीच आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यात आठ जण युक्रेनमधील व एक तुर्कस्थानमधील नागरिक आहे. पोलिसांनी संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटिस जारी केली आहे.
कुठे टाकले छापे
यामध्ये प्लाटिनम हेर्ने प्रा. लि च्या संचालक सर्वेश सुर्वे यांच्या उमरखाडी, मुंबई येथील निवासस्थानी, तसेच मे. जेमेथीस्ट (किशनपोल बाजार, जयपूर), मे. स्टेलर ट्रेडिंग कंपनी (जौहरी बाजार, जयपूर आणि काळबादेवी, मुंबई) या सहयोगी संस्थांच्या कार्यालयांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. तसेच, प्रमुख सहयोगी लल्लन सिंग यांचे मुलुंड, मुंबई येथील निवासस्थान आणि संशयित हवाला ऑपरेटर अल्पेश प्रवीणचंद्र खारा यांच्या मुंबईतील ऑपेरा हाऊस येथील निवासस्थानीही तपासणी करण्यात आली. यावेळी फसवणूक योजनांशी संबंधित अधिक पुरावे उघडकीस आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai