तेनालीराम आणि तेल
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 06, 2021
- 958
भारत स्वतंत्र झाल्यापासून आखाती देशांतून तेल आयात करून आपली देशांतर्गत गरज भागवत आहे. त्यावर मात करण्यासाठी भारताने अणुऊर्जा, नैसर्गिक वायू पासून विद्युत निर्मिती, औष्णिक ऊर्जा आणि आता सोलर ऊर्जा वापरण्याचा व विकसित करण्याचा प्रयत्न गेल्या दोन दशकांपासून सुरु ठेवला आहे. त्याचबरोबर देशालगत असलेल्या विस्तीर्ण समुद्रातुन खनिज तेलाचे उत्खनन करून तेलाबाबत आत्मनिर्भर बनण्यासाठी गेली अनेक वर्ष केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या तेल उत्खननावर शेकडो कोटी रुपये केंद्रसरकार दरवर्षी खर्च करत असते. भारत सरकारन ओएनजीसी सारखी कंपनी स्थापून त्यामाध्यमातून गेली अनेकवर्ष भूगर्भातील तेल शोधून त्याचा उपसा कशा पद्धतीने करता येईल यासाठी हा प्रयत्नशील आहे. आपला देश विकसनशील असल्याने मोठ्या प्रमाणावर खनिज तेल, कोळसा, यासारख्या नैसर्गिक साधनसंपदेवर अवलंबून आहे. देशाचे परकीय चलन / गंगाजळी त्यासाठी खर्च होत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर भारत सरकारचेच तेल निघत असते. पण बुद्धिजीवी भाजप सरकार मधील तेनालीरामने या आपदेतूनही अवसर शोधला असून मोठ्या प्रमाणावर जनतेवर करवाढ लादून सर्वसामान्यांच्या खिशातूनच तेल व नैसर्गिक गॅस काढण्याचा अभिनव प्रयोग देशात प्रथमच सुरु केला आहे.
उत्तर भारतात चतुर बिरबल आणि दक्षिण भारतात तेनालीराम यांच्या सुरस कथा त्यांच्या बुद्धी चातुर्याबद्दल प्रसिद्ध आहेत. आपली बाजू पडकी असली तरी कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला पटवून द्यावी किंवा एकदम अडचणीच्या वेळी कशी वेळ मारून न्यावी हे या दोघांच्या बुद्धी चातुर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या कथावरून शिकायला मिळते. आपल्या देशातही अशाच बुद्धिजीवी राजकीय तेनालीरामाच्या गोष्टी सध्या अनुभवायला मिळत आहेत. सध्या देशात तेल आणि गॅस यांच्या किमती कमालीच्या वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यात स्वयंपाकाचा गॅस 225 रुपयांनी वाढला असून पेट्रोलने काही राज्यात शंभरी पार केली आहे. डीझेलही गेल्या वर्षभरात 26 रुपये प्रति लिटरने वाढले असून त्यामुळे अनेकांच्या व्यवसायांची गणिते चुकली आहेत. या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारले असता या भाववाढीला केंद्र सरकार जबाबदार नसून आंतरराष्ट्रीय परिस्तिथी जबाबदार असल्याचे सरकार मधील तेनालीराम सांगत आहेत. मोदी, स्मृती इराणी, किरीट सोमय्या, रवी शंकर प्रसाद सारखे राजकीय नेते जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यावेळच्या तेल दरवाढीवर व वाढत्या महागाईने जनतेच्या पोटाला पीळ पडतो म्हणून कांगावा करणारे वर्तन हि खरीच नौटंकी होती हे सत्तेत बसल्यावर त्यांनी महागाईबद्दल दिलेल्या सफाईवरून जाणवते. सत्ता मिळवण्याच्या हेतूने लोकांच्या भावनांचा बाजार अशापद्धतीने मांडता येतो हे त्यांनी देशवासियांना दाखवून दिले.
सध्या जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर खूपच कमी असून त्याप्रमाणात भारतात मात्र हे दर विश्वविक्रमाला गवसणी घालत आहेत. भारताला प्रत्येक क्षेत्रात उंची गाठून देण्याचा ध्यास घेतलेल्या या बीजेपीच्या तेनालीरामाने आपल्या गोदी मिडिया माध्यमातून ते सध्या करण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे भारत सध्या निरनिराळ्या क्षेत्रात कशा पद्धतीने मानांकन मिळवत आहे हे जगात प्रसिद्ध होणार्या निरनिराळ्या अहवालांवरून दिसून येत आहे. नुकतेच जगातील सर्वात महागडे पेट्रोल-डिझेल विकत घेणारी जनता हा अनेक मनाचा तुरा भारतीयांच्या शिरपेचात मोदींमुळे रोवला गेला आहे. त्यामुळे भारतीयांचीही छाती 56 इंचाने नक्कीच फुलली असेल. महागडे पेट्रोल डिझेल विकत घेणे म्हणजे जाज्वल्य राष्ट्रप्रेम, निस्सीम राष्ट्रभक्तीचा अंगीकार हि भावना भारतीयांच्या मनात ठसवण्यास भाजपचे तेनालीराम कमालीचे यशश्वी ठरल्याने, एवढे भाव वाढूनही जनता या भाववाढीला विरोध न करता त्याचा स्वीकार आपले प्राक्तन म्हणून करत आहे. महागडे तेल विकत घेऊन देशाच्या विकासाला आपण उलट हातभार लावत आहोत या भावनेत सध्या जनता असल्याने सध्यातरी विरोधकच या विरुद्ध बोलताना दिसत आहेत. आपल्या राज्यातील परिस्तिथीही फारशी वेगळी नाही, राज्यातील वाढत्या वीजबिलांविरुद्ध तेनालीराम बेंबीच्या देठांपासून आवाज उठवत असताना पद्धतशीरपणे व जाणीवपूर्वक मात्र देशातील वाढत्या पेट्रोल-डीझेल दरांविरुद्ध मूग गिळून गप्प आहेत. कारण जर केंद्र सरकार विरुद्ध वाढत्या महागाई विरोधात आवाज उठवला तर तेथील तेनालीराम सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून कोठून धूर/गॅस काढतील हे माहित असल्यानेच राज्यातील तेनालीराम हे मी पुन्हा कधी येईन या दिवा स्वप्नातच व्यस्त आहेत.
वाढत्या तेलाच्या दरांचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. दळणवळणाचे दर वाढू लागल्याने आता लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू लागले आहेत. तूरडाळीने पुन्हा शंभरी गाठली आहे तर कांदा पुन्हा गृहिणीच्या डोळ्यातून पाणी काढायला लागला आहे. रिक्षा आणि टॅक्सी यांच्या मुळ भाड्यात वाढ सरकारने केली आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन अभिनयाचे आंदोलन करणार्या स्मृती इराणी, पेट्रोल परवडत नाही म्हणून सायकल चालवणारे रवी प्रसाद, वाढत्या महागाईमुळे लोकांच्या कष्टावर प्रकाश पडणारे जावडेकर, भारताच्या रुपयाचे अवमूल्यन झाले आणि महागाई वाढली म्हणून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ढासळता रुपया आणि अर्थव्यवस्थेवर सल्ला देणारे विद्यमान अर्थतज्ज्ञ नरेंद्र मोदी या वाढत्या महागाई बद्दल ब्र ही काढायला तयार नाहीत. परंतु विरोधक कुठे काय शिंकला कि यावर मात्र सकाळ संध्याकाळ ट्विट करायला आणि प्रसार माध्यमांशी चर्चा करायला पुरेसा वेळ त्यांच्या कडे असतो, कारण प्रश्नही विचारणारे त्यांच्याच ओंजळीने पाणी पीत असल्याने महागाईबद्दल कोणीही प्रश्न विचारणार नाही याची त्यांना शाश्वती आहे.
लोकांनी आम्हाला निवडून दिले म्हणजे आमच्या धोरणांना त्यांनी स्वीकारले असा समज सध्या तेनालीराम आणि गोदी मीडियाचा झालेला पाहायला मिळत आहे. मोदींच्या धोरणांना विरोध करणारा विरोधी पक्ष देशात का नको याचे गूढ आता हळू हळू उलगडू लागले आहे. भाजपच्या तेनालीरामाने देशातील मीडियाला हाताशी धरून आपल्याला हवे तेच लोकांना दाखवून लोकांच्या सारासार विचार करण्याच्या बुद्धीला छेद दिला. जर विरोधक देशात शिल्लक राहिला तर मात्र आपल्याला विरोध होऊ शकतो या भावनेने विरोधकांचे सरकारही पाडण्यात आले. परंतु गेल्या काही महिन्यांपासून देशातील चित्र हळू हळू बदलताना दिसत आहे. कोरोना संक्रमण नंतर गोर-गरिबांसाठी काही तरी पाऊले सरकार उचलेल अशी असलेली आशा धुळीला मिळाली आहे. पंतप्रधान मोदींना चुलीवर जेवण करणार्या महीलांचे दुःख पाहत नव्हते म्हणून ज्या कथित आठ कोटी महिलांना ‘उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस सिलिंडर वितरित केला, त्या महिलांनी मोदींनी दिलेल्या श्रीमंतीला त्यागून पुन्हा आपल्या लाकडी चुलीचे वास्तव स्वीकारले आहे. रामराज्याचे स्वप्न विकणार्या तेनालीरामांच्या देशातील डिझेल-पेट्रोलचे दर रावण आणि सीतेच्या देशापेक्षा हि महाग असल्याचे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी करून देशात रामराज्य आहे कि रावण राज्य आहे याचा विचार करण्याचे देशातील जनतेला अप्रत्यक्ष सुचवले आहे.
गेल्या 6-7 वर्षात सुमारे 23 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने तेल दरवाढीतून कमावले आहेत. खरतर केंद्राच्या करातील रक्कमेच्या 40 टक्के रक्कम हि त्या-त्या राज्यांना द्यायची असते, पण ती देऊ लागू नये म्हणून बुद्धिजीवी तेनालीरामाने सेसच्या माध्यमातून करवाढ जनतेवर लादली आणि राज्य सरकारचेही अप्रत्यक्ष तेल काढले. गेले सहा वर्ष असेच तेल जनतेच्या खिशातून सरकार आणि खासगी कंपन्या तेल काढत असून त्याला कुठेतरी आळा बसणें गरजेचे आहे. एकतर आंदोलनाच्या माध्यमातून हे शक्य आहे किंवा सत्ता परिवर्तनाने हे शक्य आहे. आंदोलनाचा मार्ग सध्या कठीण वाटत आहे. जनतेला गृहीत धरणार्या तेनालीरामांचेच तेल काढण्याची वेळ मतदानाच्या माध्यमातून सध्या जनतेवर आली आहे. पुढील चार महिन्यात पांच राज्यात निवडणुका असून तेनालीरामांच्या वक्तृत्व चातुर्याला बळी न पडत आपला मतदानाचा हक्क समर्पक रीतीने बजावल्यास अशक्य काहीच नाही नाहीतर पुढील पिढीला तेलीराम आणि तेली यांच्या सुरस कथा वाचायला मिळतील हे निश्चित.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai