Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या संगणकीय प्रणालीत कंपनीच्या करावर लावण्यात आलेल्या दंडाची व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी कंपनी मालकाकडून 1 लाखांची लाच स्विकारताना नवी मुंबई महापालिकेच्या सेस-एलबीटी स्थानिक संस्था कर विभागातील लिपिकाला (कंत्राटी कामगार) नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
तक्रारदारांची खैरणे एमआयडीसीमध्ये कंपनी असून नवी मुंबई महापालिकेकडून आलेला सन 2013 ते 2016 या कालावधीतील सेस कर त्यांनी 2019 साली भरला होता. तक्रारदार यांनी 2013 ते 2016 या कालावधीतील सेस कर वेळेत न भरल्यामुळे त्यावर दंडाची रक्कम व व्याजाची रक्कम त्यांना भरावी लागणार असल्याची भिती सेस-एलबीटी विभागातील लिपीक कर्मचारी विनायक पाटील यांनी दाखविली होती. तसेच कोपरखैरणे येथील सेस-एलबीटी विभागातील कार्यालयीन संगणकिय प्रणालीमध्ये त्यांच्या दंडाची रक्कम व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी त्यांच्याकडे 3 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे कंपनी मालकाने नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पडताळणी करुन सापळा लावला होता. कंपनी मालकाने 3 लाख रुपये लाच देण्याचे कबुल करुन त्यातील 1 लाख रुपयांचा पहिला हफ्ता देण्याची तयारी दर्शविल्यानंतर लिपीकाने कंपनी मालकाला सीबीडी बेलापुर मधील दिवाळे गाव येथील बिकानेर स्वीट मार्ट समोर लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी लाच घेऊन गेलेल्या कंपनी मालकाकडून पाटील याने त्याच्या कारमध्ये 1 लाख रुपयांची रक्कम स्विकारल्यानंतर अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. सदरची कारवाई नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोच्या पोलीस उपअधिक्षक ज्योती देशमुख व त्यांच्या पथकाने केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai