Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छतेमधील नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्यासाठी नुकत्याच आठही विभागांमध्ये महामार्ग, मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, दुर्लक्षित जागा याठिकाणी सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. या मोहीमांतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्या कडेला जमा झालेली माती गोळा करुन हवेतील धूळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन पाहणी करण्यास सुरुवात केली असून त्यांनी ऐरोली विभागातील मुख्य रस्ते व प्रामुख्याने एमआयडीसी भागातील रस्ते तसेच स्वच्छता, डेब्रिज, दुभाजक, आयलँड, रस्त्याच्या साईडपट्टया अशा विविध बाबींची पाहणी केली. विशेष म्हणजे ही पाहणी त्यांनी सायकलवरुन केली.
चारचाकी गाडीने जाताना वेगामुळे काही वेळा प्रत्यक्ष स्थितीचा अंदाज येत नाही, त्यामुळे सायकलसारखे पर्यावरणपूरक वाहन वापरुन शहरातील स्थितीचा आयुक्त कार्यालयीन वेळीच्या आधी सकाळी लवकरच नियमित आढावा घेत असतात. त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना घेऊन कोणत्या भागाची पाहणी करणार याची पूर्वकल्पना न देता ऐनवेळी सांगत ऐरोली भागाची पाहणी केली. सेक्टर 5 येथील टि जंक्शनपासून सुरुवात करीत अंडरपास खालून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिसर, राजष छत्रपती शाहू महाराज शाळा व एमआयडीसी रोडने ऐरोलीपर्यंतच्या पाहणी दौऱ्यात ठिकठिकाणी थांबत आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. शाळा परिसर तसेच अंतर्गत भागातील परिसर स्वच्छ व नीटनेटका असावा तसेच तेथील सुविधांबाबत त्यांनी निर्देश दिले. परिसर स्वच्छतेप्रमाणेच नागरिकांना चालण्यासाठी पदपथ रिकामे असावेत हे लक्षात घेउुन पदपथांवरील अतिक्रमण काढावे, बांधकामे सुरु आहेत अशा ठिकाणी उंच पत्रे लावलेले असावेत व तेथील डेब्रीजची वाहतूक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम व्यवसायिकाकडूनच करुन घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. काटईकडे जाणाऱ्या उड्डाणपूलाखाली एमआयडीसी रोडच्या दोन्ही कॉर्नरला बांबू व इतर देशी वृक्षारोपांची लागवड करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. एमआयडीसी भागातील रस्त्याचा दुभाजकामधील हिरवळीची व छोट्या झाडांची दूरवस्था पाहून नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी त्यामध्ये त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश संबधितांना दिले. अश्विन कॉरीजवळील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करुन घ्यावी व त्याभोवतालचा परिसर स्वच्छ व सुशोभित करुन घ्यावा असेही आयुक्तांनी निर्देश दिले. पाहणी केलेल्या भागाची नाही तर शहरातील सर्वच भागांची दिलेल्या सूचनांनुसार सुधारणा तत्परतेने हाती घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai