Breaking News
ज्येष्ठनागरिक काळजी केद्रांचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते लोकार्पण
नवी मुंबई ः ज्येष्ठनागरिकांची काळजी घेण्यासाठी एखादे केंद्र असावे या संकल्पनेतून ओल्ड एज होम अर्थात ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्राची संकल्पना पुढे आली असे सांगत आमदार मंदा म्हात्रे यांनी ही सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्याचा आनंद व्यक्त केला. आ. मंदा म्हात्र यांच्या संकल्पनेतुन नेरुळ येथे उभारलेल्या ओल्ड एज होम चे लोकार्पण त्यांच्याच हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
ज्येष्ठ नागरिकांना अनेक कौटुंबिक, सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना मानसिक आधार देण्याची गरज असून विरंगुळा केंद्रांच्या माध्यमातून समवयस्क लोक एकत्र येतात, भेटतात, सुख-दु:खाच्या गोष्टी करतात, त्यामुळे त्यांना मानसिक दिलासा मिळतो. नवी मुंबई महानगरपालिकेचे हे काम ज्येष्ठांप्रती आपुलकी दर्शविणारे असून यापुढे जात ज्या ज्येष्ठांना काही अडचणींमुळे 15-20 दिवस राहण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी एखादे केंद्र असावे या संकल्पनेतून ओल्ड एज होम अर्थात ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्राची संकल्पना पुढे आली. ही संकल्पना मांडण्यापासून, जागा उपलब्ध करुन घेण्यापासून हे केंद्र कार्यान्वित होईपर्यंत विविध टप्प्यांवर पुढाकार घेऊन केलेल्या कार्यवाहीचा तपशील त्यांनी यावेळी सांगितला.
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने से.28 करावे तलावानजिक सीवूड नेरुळ याठिकाणी उभारण्यात आलेल्या वृध्दाश्रमामध्ये आयोजित ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आ.मंदाताई म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचा इतरांना हेवा वाटावा अशा प्रकारचे कार्य येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी होत असून सानिध्य, स्पर्श व संवाद या तीन गोष्टी ज्येष्ठांसाठी महत्वाचे असल्याचे लक्षात घेत विरंगुळा केंद्रासारखी संकल्पना तसेच वृध्दाश्रमासारखी सुविधा उपलब्ध करुन देऊन पालिकेने ज्येष्ठांप्रती आपला आदरभाव व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते, गटारे, दिवाबत्ती अशा सुविधा कामांच्या पलिकडे जाऊन समाजविकासासाठी भरीव काम करणे हे नवी मुंबई महापालिकेचे वैशिष्ट असून यापुढील काळात ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अदययावत आरोग्य सुविधा आता उपलब्ध्ा होत असून औषधोपचारामुळे आयुर्मानही वाढत असल्याचे मत व्यक्त करीत यापुढील काळात ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तशा प्रकारचे नियोजन शासन, प्रशासनाला करावे लागेल असेही ते म्हणाले.
विरंगुळा केंद्राप्रमाणेच वृध्दाश्रम ही चांगली सुविधा असून त्याचा लाभ मोठया प्रमाणात होईल असेही ते म्हणाले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मुंबई नवी मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी ही वास्तू ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार देणारी होईल असे सांगितले. या स्नेहमेळाव्याप्रसंगी विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai