शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात नाईकांची डरकाळी
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 31, 2025
- 345
ठाणे महापालिकेसाठी जनता दरबारद्वारे मोर्चेबांधणी
ठाणे ः ठाणे ः जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना ठाण्यात जनता दरबाराद्वारे ठाणेकरांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय मंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातूनच नाईकांनी शिंदेंना जनता दरबाराच्या माध्यमातून आव्हान दिल्याने गणेश नाईक ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका महायुतीद्वारे लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नाईकांच्या या डरकाळीने राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मुळचे शिवसैनिक असलेले गणेश नाईक यांनी त्यांच्या राजकीय कारर्किदीची सुरुवात ठाण्यातूनच केली होती. दर आठवड्याला ते ठाण्यातील जनतेला भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असत. आनंद दिघे यांच्या उदयानंतर नाईक यांनी आपला दरबार नवी मुंबईत भरवण्यास सुरुवात केली. अनेकवर्ष ठाण्यात काम केल्याने त्यांना ठाण्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची चांगली जाणिव आहे. ते स्वतः आगरी समाजाचे नेते असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग बाळकुम, कळवा, खारेगाव येथे आहे. मंत्री व पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी नवी मुंबई, ठाणे, दहिसर या भागात महिन्याला एक असा जनता दरबार भरवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा उपक्रम राबवला होता.
2019 ते 2024 या कालखंडात ते आमदार म्हणून निवडून आले असले तरी शिंदे यांच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही अशी चर्चा त्यावेळी होती. तसेच शिंदे यांच्या नगरविकास विभागाने नवी मुंबईतील कारभारात अनावश्यक दखल दिल्याचा आरोप त्यावेळी नाईकांनी विधानसभेत केला होता. कल्याण पालिका क्षेत्रातील 14 गावे निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई महापालिकेत जोडण्यात आली त्याला नाईकांनी कट्टर विरोध केला होता. त्यातच शिंदे समर्थक चौगुले यांनी नाईकांच्या विरुद्ध बंडखोरी करुन त्यांना पराभुत करण्याचा काटेकोर प्रयत्न केला, त्यास शिंदे यांची फुस होती अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती. या पार्श्वभुमीवर नाईक आणि शिंदे यांचे सौख्य विळा भोपळ्याचे असल्याचे बोलले जाते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी पाच-सहा महिन्यात राज्यात होणार आहेत. भाजपसाठी ठाणे, मुंबई व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका महत्वाच्या असून त्या स्वःबळावर जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांची एकहाती पकड असून ते कोणत्याही पक्षाशी युती न करता सत्ता आणतील असा विश्वास त्यांना आहे. परंतु, ठाण्यामध्ये शिंदे यांचा जनसंपर्क पाहता ठाण्यात भाजपचे कमळ उमलण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शिंदेंवर आतापासूनच दबाव वाढवण्याची रणनिती भाजपने आखली असून त्या रणनितीचा नाईकांचा जनता दरबार भाग असल्याचे बोलले जाते. नाईकांचा आधीपासूनच असलेला ठाण्याशी संपर्क भाजपला शिंदेवर दबाव वाढवण्यास पुरेसा असल्याने नाईकांनी शिंदे यांनाच थेट जनता दरबाराच्या माध्यमातून आव्हान देत योग्य तो संदेश शिंदेंच्या समर्थकांना दिला आहे. त्यामुळे नाईकांच्या डरकाळीचा फायदा भाजपला कितपत होतो हे येणाऱ्या निवडणुकीतून दिसेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai