टायफॉईड संरक्षक लसीकरणाचा 72500 मुलांना लाभ

नवी मुंबई ः पालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रात 14 जुलै 2018 पासून टायफॉईड कंज्युगेट लसीकरण अभियान सुरु झाले असून ही मोहीम 25 ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्र नेरुळ से.48, नेरुळ फेज 1, शिरवणे, तुर्भे, इंदिरानगर, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा, दिघा या 11 नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येत असून दि. 14, 15, 21, 22, 28 आणि 29 जुलै या सात दिवसात 9 महिने ते 15 वर्षाआतील एकुण  72,529 मुलांना लसीकरण करण्यात आले आहे.

या टायफॉईड कंज्युगेट लसीला  जागतिक आरोग्य संघटनेकडून पूर्वपात्रता असून त्यांच्यामार्फत या लसीची शिफारस करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतील खाजगी बालरोगतज्ञ या लसीचा वापर मागील 5-6 वर्षापासून वापर करत असून बाजारात ही लस महाग आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगपालिकेमार्फत ही लस मोफत दिली जात असून पुढील लसीकरण सत्रे 12, 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली आहेत. या लसीकरण निमित्ताने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून डॉ. स्टीफेन लुबी, सीडीसी डॉ. कश्मिरा दाते व जागतिक आरोग्य संघटनेमार्फत महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी डॉ. राहुल शिंपी यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या टायफॉईड लसीकरण मोहिमेची पाहणी केली. यामध्ये त्यांनी चिंचपाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयात नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेऊन त्यांनी महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या टायफॉईड लसीकरण मोहिमेबाबत महापालिका कामाची प्रशंसा केली व मोहीमेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना केल्या. तरी याचा लाभ ज्यांनी अद्याप घेतला नाही. त्यांनी पालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट द्यावी असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.