Breaking News
नवी मुंबई ः महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सूटला असताना भाजपचा घोडा मात्र ठाणे मतदार संघावर अडकला होता. कार्यकर्त्यांचा विरोध डावलून फडणवीसांनी कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या या कुटनितीमुळे ठाणे मतदारसंघ भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय जाहीर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महायुतीचा जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरु असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक खासदारांना तिकीट न मिळाल्याने प्रचंड असंतोष शिंदेसेनेत आहे. तुमचे पुनर्वसन करण्यात येईल या आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात येत आहे. त्यातच कल्याण आणि ठाणे या दोन्ही मतदार संघावर शिंदेसेनेने दावा केल्याने महायुतीचा जागा वाटपाचा घोडा अडला होता. त्यातच कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना भाजपने विरोध दर्शविल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली होती. ही जागा वाटपाची कोंडी फुटत नसल्याने फडणवीसांनी एकतर्फी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कल्याणमधून जाहीर करुन एक पाऊल मागे घेतल्याचे भासवले. त्याचवेळी फडणवीसांनी ठाण्यात भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन करुन शिंदे यांना योग्य संदेश दिला.
शिंदेसेनेकडे विद्यमान खासदार राजन विचारे यांना टक्कर देणारा ताकदीचा उमेदवार नसल्याचे जगजाहीर असताना ही जागा भाजपला देणे शहाणपणाचे ठरेल असे सांगण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून भाजप करत आहे. त्यातच शिंदे यांना ठाण्याची सूत्रे भाजपमार्फत नाईक कुटुंबाकडे देण्यास विरोध असल्याचे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे. त्यांनी फडणवीसांना संजीव नाईकांऐवजी दुसरा उमेदवार देण्याचे सुचवल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे. भाजपकडे सध्या ठाणे मतदार संघासाठी माजी खासदार संजीव नाईक व राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे ही दोन नावे आहेत. मध्यंतरी सहस्त्रबुद्धे यांनी नवी मुंबईत अनेकवेळा हजेरी लावल्याने तेही गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाणे मतदार संघाचा उमेदवाराचा तिढा येत्या दोन दिवसात सूटणार असल्याचे सुत्रांकडून कळते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai