Breaking News
नवी मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रकिया सुरू झाली आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या उमेदवारांमध्ये असंख्य उच्चशिक्षीत पदवीधरांचा समावेश असल्याचे पाहायला दिसत आहे. तसेच ज्या भागात पावसामुळे व्यत्यय येत आहे तेथील मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. 17 हजार 471 पदांसाठी ही भरती होणार असून त्याची मैदानी चाचण्या सुरु झाल्या आहेत. नवी मुंबई पोलीस दलातील 185 पोलीस शिपाई पदांसाठी 19 जून पासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी सात हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पोलीस शिपाई होण्यासाठी बारावी उत्तीर्ण अशी पात्रता भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नवी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी राज्यभरातील असंख्य उच्चशिक्षीत पदवीधरांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये विविध शाखेचे ग्रॅज्युएट, एलएलबी, एमए, एम.कॉम., बी.एससी, बीए, बी.फार्म झालेले असंख्य तरुण-तरुणींचा समावेश असून यात आर्मीमधून ग्रॅज्युएट झालेले काही उमेदवार देखील पोलीस शिपाई होण्यासाठी मैदानी चाचणी देताना दिसून येत आहेत.
नवी मुंबईतील पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेत बी.टेक 15, बी.फार्म 10, एलएलबी 2, बीपीएड 2 यासह बीए, बीकॉम, बीएससी आणि इतर ग्रॅज्युएट झालेल्या 2,204 उच्चशिक्षीत उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आर्मीमधून ग्रॅज्युएट झालेल्या 33 तरुणांनी देखील या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे. सुरक्षित भविष्याच्या उद्देशाने पोलीस शिपाई पदाच्या भरतीत सहभाग घेतल्याचे या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उच्चशिक्षीत तरुणाने सांगितले. सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सरकारी नोकरी मिळणे खूपच अवघड झाले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. त्यामुळे सदर भरतीसाठी उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. सुरक्षित नोकरी प्रापत करुन भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai