Breaking News
केंद्रीय वस्त्र मंत्रालयामार्फत नवी मुंबईची निवड
नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयामार्फत ग्राहक वापरानंतरचे कपडे पुनर्प्रक्रियेचा प्रायोगिक प्रकल्प नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. याविषयी जनजागृती करण्याकरीता पालिका क्षेत्रातील सोसायटी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाली.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दैनंदिन कचऱ्याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जात असताना त्यामधून टाकाऊ कपडयांचेही स्वतंत्र वर्गीकरण करण्यात येऊन हे कपडे पुनर्वापरात आणण्याबाबतचा हा अभिनव प्रकल्प प्रायोगिक स्वरुपात राबविण्यासाठी नवी मुंबई शहराची निवड केल्याबद्दल केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाचे नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आभार मानले व जागरुक नवी मुंबईकर नागरिक यात सक्रिय सहभागी घेऊन हा उपक्रम यशस्वी करतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय वस्त्र मंत्रालयाचे संचालक तपनकुमार राऊत यांनी नवी मुंबई शहर हे स्वच्छतेविषयी अतिशय जागरुकतेने काम करीत असून नाविन्यपूर्ण स्वच्छता उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडीवर असते, त्यामुळे हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी नवी मुंबईची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले. यामध्ये केंद्रीय वस्त्र समिती, नवी मुंबई महानगरपालिका तसेच स्वयंसेवी संस्था यांचा एकत्रित सहयोग असणार असून सोसायटी पातळीवर कपडे संकलन कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून नागरिकांकडून वापरात नसलेले टाकून दिले जाणारे कपडे म्हणजे कचरा नाही, त्याचा पुनर्वापर होऊ शकतो व त्यावर पुनर्प्रक्रिया करता येऊ शकते हे लक्षात घेत हा प्रकल्प राबविला जाणार असून या प्रक्रियेत स्वयंसहाय्यता बचत गटांनाही काम मिळेल व महिलांचे सक्षमीकरण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसहभागाशिवाय हा उपक्रम यशस्वी होणे शक्य नाही याकरीता आज सोसायटी पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद करण्यात येत असल्याचे सांगत नवी मुंबईकर नागरिक यात मोठया प्रमाणावर सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करतील आणि नवी मुंबईचे महानगरपालिकेचे मॉडेल म्हणून हा उपक्रम ओळखला जाईल अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या फॅशन ट्रेंड बदलाच्या प्रचंड गतिमान युगात फॅशन सायकल आता केवळ 15 दिवसांवर आली असल्याचे चित्र असून कचरा म्हणून टाकल्या जाणाऱ्या कपडयांचा गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे, यावर सकारात्मक उत्तर शोधण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविला जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी केंद्रीय वस्त्र मंत्रालयाचे अधिकारी प्रकाश सेन यांनी सादरीकरणाव्दारे प्रकल्पाची कार्यवाही विशद केली. हा उपकम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक सोसायटीकरिता एका समन्वयकाची नेमणूक करण्यात येईल व त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai