Breaking News
समितीचा अहवाल पालिकेकडून शासनाकडे मंजुरीसाठी सादर
नवी मुंबई : सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी नवी मुंबई क्षेत्रातील अपुऱ्या पार्किंगविषयी केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी 2016 पासून मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येक घरामागे एक पार्किंग बंधनकारक केली होती. परंतु, शासनाने 2020 मध्ये आणलेल्या एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीत या आदेशाला फाटा देत नवीन धोरण राबवले जे मुळ धोरणापेक्षाही कमी पार्किंगची व्यवस्था करणारे होते. या संबंधिच्या याचिकेवर फेरआढावा घेताना न्यायालयाने यावर समिती नेमूण त्याचा अहवाल शासनास सादर करण्यास पालिकेला सांगितले. पालिकेने सदर अहवाल शासनास सादर केला असून त्यामुळे विकासकाला आता मुबलक पार्किंग सदनिकाधारकांना द्यावी लागणारआहे.
मुंबई महानगर प्रदेशातील प्रमुख शहरांप्रमाणेच नवी मुंबईत पार्किंगचा प्रश्न आ वासून उभा आहे. वाशीतील सामाजिक कार्यकर्ते आणि नियोजन क्षेत्रातील अभ्यासक संदीप ठाकूर यांनी नवी मुंबईतील पार्किंग व्यवस्थेसंबंधीची एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मध्यंतरी नवी मुंबईतील पार्किंग व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनास दिले होते. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यासंबंधी कोकण विभागाचे तत्कालीन सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती. भोपळे यांच्या समितीने नवी मुंबईत माफक आणि पुरेशा पार्किंग व्यवस्थेसंबंधी काही महत्त्वाच्या शिफारशी आयुक्त डॉ. शिंदे यांना सादर केले होते. या शिफारशींच्या अनुषंगाने महापालिकेने 1जानेवारी 2025 रोजी यासंबंधीची नवी नियमावली जाहीर केली असून यामध्ये नव्या पार्किंग व्यवस्थेत महत्त्वाचे बदल सुचविले आहेत. नव्या नियमांमध्ये रहिवासी इमारती, बंगले तसेच मोठया बैठ्या घरांसाठी मुबलक पार्किंगचे नियोजन असेल अशाच पद्धतीने आखणी केली आहे. यासंबंधीच्या फेरबदलांवर राज्य सरकारचा निर्णय अंतिम असणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार यापुढे 1500 चौरस फुटांपेक्षा अधिक घराचा आकार असलेल्या एक घरामागे बिल्डरांना किमान 2 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय यापेक्षा मोठे घर उभारणाऱ्या बिल्डरांना 1500 चौरस फुटांवरील प्रत्येक 500 चौरस फुटांवरील घरासाठी आणखी एक पार्किग व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय एक जागा दुचाकीसाठी ठेवणेही बंधनकारक राहील. 800 ते 1500 चौरस फुटांच्या प्रत्येक एका घरासाठी 2 चारचाकी तर एका दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय एकूण घरांच्या बांधणीच्या तुलनेत 5 टक्के अधिक व्हिजिटर पार्किंगची व्यवस्थाही बिल्डरला करावी लागणार आहे.
600 ते 800 चौरस फुटांच्या प्रत्येकी दोन घरांमागे तीन चारचाकी वाहने तर दोन दुचाकी वाहनांची व्यवस्था करणे या नव्या नियमानुसार बंधनकारक करण्यात आले आहे. 400 ते 600 चौरस फुटांच्या प्रत्येकी दोन घरांमागे 2.50 या प्रमाणात पार्किंग काढण्याचा नियम आखण्यात आला असून 2 दुचाकी उभ्या राहतील अशी व्यवस्थाही बिल्डरांना करावी लागणार आहे. 300 ते 400 चौरस फुटांच्या प्रत्येकी दोन घरांमागे 2 चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्यांसाठी पार्किंग काढावे लागणार असून 300 चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या एका घरासाठी किमान एक चारचाकी गाडीचे तर दोन दुचाकी उभ्या राहतील अशी व्यवस्था करावी लागणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने गठित केलेल्या समितीने पार्किंगसंबंधी बनवलेल्या नियमावलीमुळे नवी मुंबई शहर हे निश्चितच राज्यातील सर्वाधिक पार्किंग व्यवस्था असलेले शहर ठरले आहे. नवी मुंबईतील संकुलांमधील पार्किंग व्यवस्था ही इतर शहरांच्या व्यवस्थेपेक्षा उत्तम आहे. नव्याने करण्यात आलेली आखणीही इतर शहरांच्या तुलनेत चांगली दिसत आहे. या व्यवस्थेची अंमलबजावणी उत्तम पद्धतीने होईल यासाठी महापालिकेने आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे. - संदीप ठाकूर, याचिकाकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai