Breaking News
खाडीतील जलप्रदुषण टाळण्यासाठी एमआयडीसीचा पुढाकार
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने असलेल्या रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी 27 वर्ष जुनी 3.6 किलोमीटर वाहिनी नव्याने उभारण्यासाठीचा प्रस्ताव एमआयडीसीने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवला असून यासाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून महत्त्वाचे सल्लेही देण्यात आले आहेत. याबाबत महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये या प्रस्तावास सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्र ओळखले जायचे. परदेशातून आणि देशभरातून अनेक रासायनिक कंपन्यांनी या ठिकाणी आपला जम बसवला. मात्र यानंतर खाडीत सांडपाणी थेट सोडले जाऊ लागल्याने खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ लागले. यानंतर येथील सर्व लघु मोठ्या उद्योजकांनी एकत्रित येऊन येथील रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी यासाठी पुढाकार घेऊन आणि पाठपुरावा करून नवी मुंबईतील पावने येथे सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. यानंतर येथून रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ठाणे खाडीत सोडण्यात येऊ लागले. सांडपाणी वाहुन नेण्यासाठी 1988 साली 3.6. किमीची पाईल लाईन टाकली होती. ती आता जीर्ण झाल्याने समुद्री वनस्पती व जलचरांसाठी घातक बनत आहे. त्यामुळे नव्याने जलवाहिनी टाकण्यासाठी एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन वाहिनीचे काम करताना थोड्या प्रमाणात नष्ट होणारी 98.10 मीटर क्षेत्रातील खारफुटीची दुसरीकडे सक्तीने लागवड करणे बंधनकारक असल्याचे ही राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai