Breaking News
प्रा.प्रवीण दवणे यांचे युवा पिढीला आवाहन
नवी मुंबई ः प्रत्येक माणसात स्वत:चे असे काहीतरी वेगळेपण आहे. ते ओळखा आणि आपले ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल करा. इच्छेची गुरुकिल्ली असेल तरच प्रगतीचा दरवाजा उघडतो त्यामुळे एकाग्रता आणि समग्रता ठेवून योग्य त्याची निवड करा आणि उत्साहाने जगा व आत्मभान राखून जगा अशा शब्दात प्रा.प्रवीण दवणे यांनी नवी मुंबईतील युवा पिढीशी ह्रदयसंवाद साधत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांनी वेळोवेळी मांडलेले विचार उदाहरणांसह गुंफत विदयार्थ्यांची मनोभूमिका तयार केली.
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाचे अर्थात ‘राष्ट्रीय युवक दिना’चे औचित्य साधून विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘युवकांचे विवेकानंद’ अर्थात ‘तेजातून तेजाकडे’ हे व्याख्यानपुष्प गुंफत प्रा.प्रवीण दवणे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून तरूणाईच्या विचारांना दिशा दिली. केवळ 39 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण आज 162 वर्षानंतरही साजरी करीत आहोत व यापुढेही अनेक वर्ष ती साजरी होत राहील कारण त्यांचे संपूर्ण जीवनचरित्रच नवी ऊर्जा व प्रेरणा देणारे आहे असे सांगत प्रा.प्रवीण दवणे यांनी युवकांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते, कारण भविष्य घडविण्याची ताकद युवा पिढीमध्येच आहे हा त्यांचा ठाम विश्वास होता अशा शब्दात त्यांची महती सांगितली. त्यामुळे विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे वेळेचे व्यवस्थापन योग्य रितीने स्वत:च्या विकासासाठी करा. आभासी जगात जगू नका. जागरुक राहून व्यक्तीमत्व घडवा. त्यासाठी कामात बुध्दीनिष्ठता ठेवणारा मेंदू, त्यासाठी आवश्यक कृती करणारे हात तसेच संवदेनशील ह्रदय जागे ठेवा ही व्यक्तीमत्व घडविण्याची त्रिसूत्री असल्याचे ते म्हणाल. रिल्स बघून बघून आपल्या वेळेसोबत आपले आयुष्य गुंडाळले जाते आहे याचे भान राखून ‘आयुष्य न मागे वळते रे’ हे ध्यानात घ्या व प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा ही विवेकानंदांना खरी आदरांजली आहे असे प्रा. प्रवीण दवणे म्हणाले.
जिद्द पेरा, यशाचे पीक येईल आणि आळस पेरला तर दारिद्रय येईल हे समजून घेण्याची हीच वेळ आहे, कारण तुमच्या जीवन वाटचालीची सुरूवात होत आहे, त्यामुळे म्हातारपणात पस्तावण्यापेक्षा काहीतरी बनण्यासाठी जागरुक होऊन ध्येय निश्चित करा व त्या दिशेने वाटचाल करा, त्यासाठी हवी तेवढी मेहनत घ्या असे विदयार्थ्यांना सांगत प्रा.प्रवीण दवणे यांनी शिक्षकांनीही, मग तो कोणत्याही विषयाचा असो, विदयार्थ्यांची अभिरूची घडवावी व अपेक्षित नव्हे तर अनपेक्षित प्रश्न सोडविण्याची तयारी त्यांच्याकडून करून घ्यावी असे मत व्यक्त केले. नागरिकशास्त्र हा आपल्या शिक्षणक्रमातील सर्वाधिक महत्वाचा विषय असून नवी मुंबई महानगरपालिका त्यादृष्टीने अशा प्रकारच्या नानाविध उपक्रमांतून संस्कृती जपतानाच माणूसपण बांधण्याचे फार मोठे काम करीत आहे अशा शब्दात त्यांनी गौरव केला. स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी विदयार्थ्यांची विष्णुदास भावे नाटयगृहात इतकी गद होती की विदयाथ खुर्च्यांवर, मधल्या पायऱ्यांवर तसेच व्यासपीठावरही प्रा.प्रवीण दवणे यांच्या आजुबाजूला बसले होते. व्याख्यानानंतर अनेक विदयार्थ्यांनी त्यांची भेट घेत व्याख्यानातून प्रेरणा घेऊन स्वत:मध्ये बदल घडविण्याची ग्वाही दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai