Breaking News
अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही; संदीप नाईक यांची शासनाकडे मागणी
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात नवी मुंबई शहरातील विकास प्रकल्पाकरिता कोणत्याही प्रकारे निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांचे पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी एमएमआरडीएच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून शिंदेंच्या विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील पायाभूत विकास प्रकल्पांकरता निधी मिळावा, अशी मागणी संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे.
नवी मुंबई शहर एमएमआर क्षेत्रातील विकासकेंद्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील मोठे औद्योगिक क्षेत्र, आशियातील सर्वात मोठी कृषि उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईत आहे. काही दिवसांनी सुरू होणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, या शहरात विकसित होत असलेले आयटी क्षेत्र, डेटा सेंटर्स आणि अन्य विकास प्रकल्प यामुळे या महानगरातील वाहनांची संख्या आणि दळणवळण कमालीचे वाढणार आहे. शिवाय नवी मुंबईची लोकसंख्या वाढते आहे. भविष्यातील विस्तारणारे दळणवळण, रहदारी यामुळे शहरात उड्डाणपूल, ओव्हर ब्रीज, कोस्टल रोड यासारख्या पायाभूत सुविधा बळकट करणे अत्यावश्यक आहे. याकामी येथील लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून एमएमआरडीएकडे विविध पायाभूत प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध व्हावा यासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करीत आहेत. मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 2025चा 40 हजार 187 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला असून, त्यामध्ये नवी मुंबई पालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
नवी मुंबईचा झपाट्याने होणारा विकास आणि मुंबई व नवी मुंबई दरम्यान दळणवळणाच्यादृष्टीने ऐरोली व वाशी पुलावर पडणारा ताण कमी करण्याकरिता कन्नमवारनगर ते कोपरखैरणे या मार्गावर एक नवीन उड्डाणपुल करण्याची भूमिका मांडली होती.
सदर मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण देखील करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ऐरोली ते वाशी व वाशी ते बेलापूर या दोन टप्प्यातील कोस्टल रोडच्या कामाकरिता देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच ऐरोली ते वाशी, वाशी ते बेलापूर, ऐरोली ते भांडूप असा रोप वे मार्ग उभारण्याची मागणी करण्यात आली होती परंतु या कामांकरिता देखील निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai