Breaking News
हंगामी समितीवर मनमानी कारभाराचा सदस्यांचा आरोप
नवी मुंबई ः नवी मुंबईत सिडकोनिर्मित घरांच्या पुनर्विकासाचे वारे जोरदार वाहत आहेत. नेरुळ येथील सायलेंट व्हॅली गृहनिर्माण सोसायटीमध्ये पुनर्विकासावरुन सभासदांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने सिडको, महापालिका व उपनिबंधक यांचेकडे तक्रारींचा रतीब लागला आहे. त्यामुळे सायलेंट व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोसायटीत पुनर्विकासावरुन अशांतता निर्माण झाल्याने अनेक सदस्यांनी खेद व्यक्त केला आहे.
सध्या राज्यात पुनर्विकासाचे घोडे गंगेत न्हात आहे. नवी मुंबईत सिडकाच्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेली 25 वर्षे ऐरणीवर होता. परंतु, गेल्या चार वर्षांपासून अनेक सिडको गृहनिर्माण संस्थांनी खाजगी विकासकांमार्फत पुनर्विकासाचा मार्ग चोखाळला आहे. या पुनर्विकासाच्या वाहत्या गंगेत स्थानिक राजकर्ते विकासकांना हाताशी धरुन आपलाही आर्थिक पुनर्विकास करत आहेत. राजकर्तेच स्वतःचे उखळ पांढरे व्हावे म्हणून इतके दिवस गुण्यागोविंदाने राहणाऱ्या सभासदांमध्येच गट पाडून आपल्या मजचा विकासक कसा स्विकारला जाईल हे पाहत आहेत.
नेरुळ मधील सायलेंट व्हॅली अपार्टमेंट ओनर्स असो. चे सदस्य पुनर्विकासासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न करत होते. त्यांनी यासाठी अपार्टमेंट ओनर्स असो. नोंदणी रद्द करुन सायलेंट व्हॅली गृहनिर्माण संस्था 1 जानेवारी 2024 रोजी स्थापन केली. या अपार्टमेंट ओनर्स असो. चे मुळतः 120 सदस्य असताना फक्त 65 सदस्यांची नोंदणी करत ही संस्था स्थापन करण्यात आली. संस्थेने 14 जानेवारी रोजी बोलावलेल्या सभेमध्ये हंगामी समितीची स्थापना करुन तिच्यामार्फत पुनर्विकासाचा प्रश्न माग लावण्याचा प्रयत्न केला. हंगामी समितीची मुदत ही 14 जानेवारी 2025 रोजी पर्यंत होती.
पुनर्विकासासाठी सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे गरजेचे असल्याने समितीने 25 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वसाधारण सभा बोलावून पुनर्विकासाला सर्वांची समंती असल्याचा ठराव उपनिंबधकांचे प्रतिनिधी आदेश भोईर यांच्यासमोर पारित केला. या ठरावात विकासक मोराज बिल्डकॉन प्रा.लि. यांची निविदा स्विकारण्यात आली. त्याप्रकारचा प्रस्ताव आदेश भोईर यांनी उपनिंबधक सहकारी संस्था यांना सादर केल्यानंतर उपनिंबधक प्रताप पाटील यांनी कलम 79/अ अंतर्गत पुनर्विकासासाठी सिडकोचे ना हरकत मिळण्यासाठी उपनिंबधकाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान, अनेक सदस्यांना संस्थेचे सदस्यत्व न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन न्यायालयाच्या आदेशावरुन आतापर्यंत 102 सदस्यांना सदस्यत्व देण्यात आलेआहे. समितीने 1 मे 2024 रोजी विशेष सभा बोलावून मे. मोराज बिल्डकॉन प्रा.लि. यांच्या सोबत विकसन करार करण्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन विकसन करार उरकून टाकला. सदस्यांना विकासक काय देणार आहे याबाबत कोणताही लेखी प्रस्ताव दिला नसल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला आहे. दरम्यान, ग़ृहसंकुलातील झाडांची मुळे वृक्षप्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कापण्यात आल्याने त्याबाबतची तक्रार केली असता महापालिकेने संस्थेच्या संबंधित सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नेरुळ पोलीस ठाण्याला दिले आहेत. आतापर्यंत शांततेने राहणाऱ्या सायलेंट व्हॅली या संकुलात पुनर्विकासावरुन अशांती पसरल्याने असा सदस्यांमध्ये तेढ वाढवणारा विकास आम्हाला नको अशी भुमिका अनेक सदस्यांनी घेतल्याने सायलेंट व्हॅलीच्या पुनर्विकासावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे