Breaking News
नवी मुंबई : सिडकोने जानेवारीमध्ये काढलेल्या 26 हजार घरांच्या सोडतीमधील घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा महाग असल्याने त्या कमी करण्यासाठी मनसेकडून आंदोलने, मोर्चा काढले जात आहेत. साखळी आंदोलनानंतर हजारो सिडको सोडतधारकांनी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील सिडको भवन वर भव्य इंजेक्शन मोर्चा काढला. बऱ्याच वाटाघाटी झाल्यानंतर सिडको प्रशासनाने घर निश्चित करण्यासाठी पुष्टीकरण रक्कम भरण्यासाठी 28 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. परंतु किंमती कमी करण्याविषयी कोणताच उल्लेख करण्यात आला नाही.
2 एप्रिल रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, गणेश देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेत घरांच्या किंमती कमी करण्याबाबत नकारात्मक होते. त्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये असंतोष वाढला होता. सिडकोच्या या अडेलतट्ट भुमिकेमुळे मनसेच्या नेतृत्वाखाली सिडको सोडतधारकांनी राज्य सरकार व सिडको प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला. हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष हे स्वतःच्या कुटुंबासह रखरखत्या उन्हात मोर्चात सहभागी होते. मोर्चा मधील सहभागी नागरिकांनी हातात इंजेक्शन घेऊन सिडको प्रशासनाला इंजेक्शन द्यायची गरज आहे असे मत मांडले. आता तर इंजेक्शनची सुई टोचून आम्ही सिडकोला जागरूक करत आहोत. पण सिडकोचे धोरण असेच राहिले तर यापुढे आंदोलनाचा पवित्रा तीव्र असेल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला.
परवडणाऱ्या घराची जाहिरात काढून अत्यंत महाग घरे विक्रीसाठी काढून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याची भावना मोर्चा मध्ये दिसून आली. बेलापूर येथील भूमिराज टॉवर, सेक्टर-30 येथे सुरू झालेला मोर्चा सिडको भवनच्या दिशेने गेला. पोलिसांनी मोर्चा सिडको भवन येथील सिग्नलवर अडवला व तो मोर्चा अर्बन हाट येथे नेण्यात आला. प्रशासनाचा निषेध करत सिडको सोडतधारकांनी एक छोटे घर बांधले होते. मोर्चा च्या ठिकाणी महिलांनी चूल मांडून तिथेच जेवण करायला सुरुवात केली. सिडको जर आम्हाला परवडणारे घर देत नाही तर आम्ही इथेच घर बांधून राहतो असा पवित्रा मोर्चातील महिलांनी घेतला होता. सिडको प्रशासनाचा बराच वेळ कोणताही प्रतिसाद येत नसल्याने सिडको सोडतधारक आक्रमक झाले होते. सकाळी 10 वाजता उन्हात सुरू झालेला मोर्चा 2 वाजले तरी सिडको प्रशासन ढिम्म असल्याचे पाहून गजानन काळे यांनी सोडत धारकांना जेल भरो आंदोलन करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उपस्थित हजारो सिडको सोडतधारकांनी जल्लोषात प्रतिसाद देऊन स्वतःला अटक करून घेण्याचे निश्चित केले. मनसेचा हा आक्रमक पवित्रा पाहून बऱ्याच वाटाघाटी झाल्यानंतर सिडको प्रशासनाने घर निश्चित करण्यासाठी पुष्टीकरण रक्कम भरण्यासाठी 28 दिवसांची मुदतवाढ दिली. आजच्या मोर्चाचे फलित म्हणून सर्व सिडको सोडतधारकांनी हा निर्णय मान्य केला. यामुळे पुढचा लढा लढण्यासाठी अजून वेळ मिळाली. यापुढील वेळेचा सदुपयोग करून राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊन जाणार अशी घोषणा गजानन काळे यांनी केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai