Breaking News
पनवेल : यावष पनवेल महापालिकेने कर वसुलीत नवा विक्रम केला असून मालमत्ता करापोटी मार्च अखेरपर्यंत तब्बल 412 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात (2023-24) महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी 360 कोटी रुपये जमले होते. त्या तुलनेत यंदा 52 कोटींची जादा वसुली करणेशक्य झाले आहे.
पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने रुपरेषा आखून कर वसुली केली आणि आजवरचा सर्वाधिक कर वसूल करण्याचा महापालिकेने विक्रम केला. मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या नियंत्रणाखाली उपाययोजना राबवत ही कामगिरी करण्यात यश आले आहे. मार्चमध्ये उपायुक्त स्वरुप खारगे आणि कर अधीक्षक महेश गायकवाड तसेच सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली चारही प्रभागामंध्ये मार्च संपेपर्यंत कर्मचाऱ्यांनी कोणतीही सुट्टी न घेता शनिवार, रविवारीदेखील कार्यालये सुरू ठेवली होती. महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरु केली. या वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने यावेळी 13 पथके तयार केली होती. प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही पथके कर वसुलीसाठी जात होती.
महापालिका हद्दीतील विकास कामांसाठी मालमत्ता कर हे महापालिकेचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही दिवसांपासून महापालिकेने सिडको हस्तांतरीत भाग, पनवेल औद्योगिक वसाहत, मार्बल मार्केट, जवाहर औद्योगिक वसाहत, तळोजा औद्योगिक वसाहत, अशा भागांमध्ये व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरू केली आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या होत्या यांना वॉरंट नोटीसा देण्याचे काम सुरू करून आता अटकावणीच्या मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली आहे. परिणामी मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ झाली आहे. मार्चमध्ये रोज 1 ते 5 कोटींचा मालमत्ता कर जमा होत होता. 19 मार्च रोजी महापालिकेने 2023-24 मधील 360 कोटी कर वसुलीचा विक्रम मोडीत काढला. तर 31 मार्च 2025 पर्यंत तब्बल 412 कोटींचा कर जमा झाला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai