वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 05, 2025
- 818
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयक (2025) बुधवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले आहे. लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेत देखील गुरुवारी (3 एप्रिल) रात्री 14 तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री 2.30 वाजता वक्फ सुधारणा विधेयक 128 विरुद्ध 95 मतांनी मंजूर झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयकाची मोठी चर्चा सरु होती. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण देखील पाहायला मिळालं. लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर जवळपास 12 तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाली. विरोधी आणि सत्ताधारी पक्षानेदेखील आपली भूमिका जाहीर केली. ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडली. जास्त मताधिक्य बाजुने झाल्याने लोकसभेत ते मंजुर झाले. त्यानंतर गुरुवारी वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत 12 तासांपेक्षा जास्त चर्चा झाली. या मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर वक्फ विधेयकावर मंजुरीची मोहेर उमटली. या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली, तर या विधेयकाच्या विरोधात 95 मते पडली आहेत. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलं जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल.
- ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधात मतदान-
ठाकरेंच्या शिवसेनेकडून वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान करण्यात आलं. वक्फ विधेयकात पारदशपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नसल्याची टीका ठाकरे गटाने केली. वक्फ सुधारणा विधेयकातील चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही, असं म्हणत वक्फ सुधारणा विधेयकामागे धार्मिक हेतू आहे का?, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
- किरेन रिजिजू यांची इंडिया आघाडीवर टीका
राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडताना किरेन रिजिजू यांनी, इंडिया आघाडी मुस्लिमांची दिशाभूल करत असून हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही, ते गरीब मुस्लिमांच्या विकासासाठी आणले गेल्याचा दावा केला. आत्ता वक्फच्या 8.72 लाख मालमत्ता आहेत. 2006 मध्ये सच्चर समितीच्या आकडेवारीनुसार, वक्फच्या 4.9 लाख मालमत्ता होत्या व त्यातून 12 हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. आता तर वक्फची संपत्ती वाढली आहे. त्यातून किती उत्पन्न मिळू शकते याचा विचार करा. या उत्पन्नातून गरीब मुस्लिमांचे कल्याण करता येऊ शकते, असा यु्िक्तवाद रिजिजू यांनी केला.
वक्फ विधेयकात काय काय?
- युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट,एफिशियंसी अँड डेवलपमेंट ऍक्ट असे नाव
- तरतुदी पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागणार नाहीत
- सर्व्हे आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे
- वाद मिटेपर्यंत जमिनीचा ताबा सरकारकडे राहणार
- वादग्रस्त जमिनींचा फैसला जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरचा अधिकारी करेल
- वक्फ लवादामध्ये तीन सदस्य राहणार
- लवादावर जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असतील
- सह सचिव दर्जाचा अधिकारी लवादाचा सदस्य असेल
- मुस्लिम कायद्यांचा जाणकार लवादाचा सदस्य असेल
- मुस्लिम सदस्यांपैकी दोन सदस्य महिला असतील
- परिषदेत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष,मुस्लिम कायद्याचे जाणकार मुस्लिम हवे
- परिषदेत मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी मुस्लिमच हवे
- सध्या सुन्नी आणि शिया समाजाचेच वक्फ बोर्ड
- नव्या सुधारणांनुसार आगाखानी आणि बोहरांसाठीही वक्फ बोर्ड
- वक्फचं ऑडिट कॅग किंवा तत्सम अधिकारी करणार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai