Breaking News
203 जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ
नवी मुंबई ः मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत राबविण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील सात कलमांच्या अनुषंगाने सुयोग्य कार्यवाही करण्यात नवी मुंबई पालिकेने सुरूवात केली आहे. यामध्ये प्रशासन व शिक्षण विभाग मिळून 97 अधिकारी-कर्मचारी-शिक्षक यांची पदोन्नती तसेच 203 अधिकारी-कर्मचारी-शिक्षक यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना/वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मिळालेला आहे.
100 दिवसांच्या कृती आराखड्यात प्रत्येक कलमातील बाबींनुसार कार्यालयीन स्वच्छतेपासून लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवित ऑनलाईन सेवासुविधांवर भर देण्यात येत असून नागरिकही कार्यालयांचे व कार्यप्रणालीच्या बदलत्या स्वरूपाचे कौतुक करीत आहे. महापालिका अधिकारी कर्मचारी कल्याणाच्या बाबींकडेही आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून प्रलंबित असलेली नमुंमपा अधिकारी / कर्मचारी यांची पदोन्नती तसेच त्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे या विषयांकडे प्रशासन विभागाने विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून हे प्रश्न माग लावण्याकरिता प्रशासन विभागामार्फत जलद कार्यवाही केली जात आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार व पदोन्नती निवड समितीने 100 दिवसांच्या कृती आराखडा कालावधीत म्हणजे जानेवारी 2025 पासून 18 संवर्गातील 91 अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती तसेच 18 संवर्गातील 80 अधिकारी, कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे 11 एप्रिल रोजी त्यामधील 12 संवर्गात 82 अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती तसेच 16 संवर्गातील 77 अधिकारी, कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केलेली आहे.
यासोबतच महापालिका प्रशासन विभाग आणि शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे व पदोन्नती निवड समितीने 6 शिक्षकांना पदोन्नती तसेच 123 शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू केलेली आहे. अशाप्रकारे प्रशासन व शिक्षण विभाग मिळून 97 अधिकारी-कर्मचारी-शिक्षक यांची पदोन्नती तसेच 203 अधिकारी-कर्मचारी-शिक्षक यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ मिळालेला आहे. मागील वर्षभरात म्हणजे एप्रिल 2024 पासून तब्बल 231 अधिकारी कर्मचारी शिक्षक यांना पदोन्नती तसेच 402 अधिकारी कर्मचारी - शिक्षक यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai