Breaking News
बांधकामाला आक्षेप घेणारी याचिका फेटाळली
नवी मुंबई ः पाम बीचलगत चाणक्य सिग्नल ते नेरुळ प्लॉट 7 दरम्यान हा सर्व्हिस रोड बांधण्यात येणार आहे. या रोडच्या बांधकामाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळून लावून या रस्त्याला ग्रीन सिग्नल दाखवला आहे. मुख्य न्यायमूत आलोक आराधे आणि न्यायमूत मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने हा जनहिताचा प्रकल्प असल्याचे नमूद करून महानगरपालिकेला हा प्रकल्प राबवण्यास परवानगी दिली.
सागरी किनारा क्षेत्रात (सीआरझेड) या सर्व्हिस रोडच्या बांधकामाला परवानगी देण्याच्या मागणीसाठी महापालिकेनेही याचिका केली होती. सीआरझेड क्षेत्रात विकासकामे करायची असल्यास त्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने वकील तेजस दंडे यांच्यामार्फत ही याचिका केली होती.
तथापि, उच्च न्यायालयाची परवानगी अनिवार्य असतानाही ती न घेताच महानगरपालिकेने या सर्व्हिस रोडचे काम सुरू केल्याचा दावा करून स्थानिक रहिवासी दीपक सहगल यांनी या प्रकरणी अवमान याचिका केली होती. तसेच, या सर्व्हिस रोडला आक्षेप घेतला होता. या दोन्ही याचिकांवर गेल्या आठवड्यात अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने गुरूवारी या प्रकरणी निर्णय देताना महाहपालिकेची याचिका मान्य केली, तर सेहगल यांची अवमान याचिका फेटाळली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai