Breaking News
नवी मुंबई ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान हीच शक्ती या संदेशाचा प्रत्यक्ष अविष्कार घडविणारे नवी मुंबई महापालिकेने सेक्टर 15, ऐरोली येथे उभारलेले बाबासाहेबांचे स्मारक हे ज्ञानस्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी याठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
सध्या उन्हाचा कडाका जास्त असला तरी सायं. 6 वाजेपर्यंत 9400 हून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट दिली. संध्याकाळी 4 नंतर नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मुलाबाळांसह याठिकाणी भेट देण्यास जास्त पसंती दर्शविल्याचे चित्र बघायला मिळाले व भेटी देणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले दिसले. नवी मुंबईतून ठिकठिकाणाहून निघणाऱ्या मिरवणूका, रॅली यांनीही स्मारकाला भेट देऊन अभिवादन करून पुढे जाण्यास पसंती दर्शविली. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्मारकास भेट देऊन विनम्र अभिवादन केले. स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने अल्पोपहार व चहापाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. संध्याकाळनंतर वाढलेला नागरिकांचा ओघ रात्री उशीरापर्यंत सुरू राहील असे चित्र होते. 2021 मध्ये 5 डिसेंबरला स्मारकातील सुविधा लोकार्पण झाल्यानंतर या स्मारकाकडे नागरिकांचा सातत्याने ओढा राहिला असून मागील सव्वातीन वर्षात 3 लाख 61 हजार 445 इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी तेथील रजिस्टरमध्ये नोंद करून या ठिकाणी भेट दिली आहे. येथील विविध सुविधा कक्षांना भेट देत बाबासाहेब आपल्यासोबत आहेत अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत असून अनेक मान्यवर, व्याख्याते व अभ्यासकांनीही जगातील बाबासाहेबांच्या स्मारकापेक्षा हे आगळेवेगळे स्मारक असल्याचे अभिप्राय दिले आहेत.
बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत राबविण्यात आलेली ‘जागर’ ही विशेष व्याख्यानमाला नागरिकांच्या अतिशय उत्तम प्रतिसादामुळे यशस्वी झाली. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही जयंतीदिनी ज्ञानस्मारकाला भेट देत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले तसेच जयंतीनिमित्त स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची पाहणी केली. त्यावेळी उत्तम व्यवस्थेबद्दल नागरिकांनी महानगरपालिकेची प्रशंसा केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त या स्मारकाला लक्षवेधक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हे देखील जयंतीदिनाचे खास असे आकर्षण आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai