आ.मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने पालिकेला मिळाल्या 2 रूग्णवाहिका

29 लक्ष 86 हजार निधीतून आमदार निधीतून 2 रूग्णवाहिकांचे लोकार्पण

नवी मुंबई ः पालिकेला कोव्हीड विरोधातील लढाईत बळ देण्यासाठी बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार निधीतून 2 रूग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 मधील 29 लक्ष 86 हजार निधीतून आरोग्य विभागाकरिता फोर्स ट्रॅव्हलर टी 1 पेशंट ट्रान्सपोर्ट अ‍ॅम्बुलन्स प्रकारच्या 2 रूग्णवाहिका देण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण पालिका मुख्यालयाच्या आवारात करण्यात आले.

कोव्हीड नियंत्रणात ठेवण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने अतिशय चांगले काम केले असून लोकप्रतिनिधींनीही आपापल्या विभागात नागरिकांना मदत करण्याचे काम केले आहे. लसीकरणाला गतीमानता देण्यासाठी या रूग्णवाहिकांचा वापर केला जावा अशी सूचना म्हात्रे यांनी केली होती. आ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 मधील 29 लक्ष 86 हजार निधीतून आरोग्य विभागाकरिता फोर्स ट्रॅव्हलर टी 1 पेशंट ट्रान्सपोर्ट अ‍ॅम्बुलन्स प्रकारच्या 2 रूग्णवाहिका देण्यात आल्या. त्याचे लोकार्पण महापालिका मुख्यालयाच्या आवारात करण्यात आले. याप्रसंगी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती देत यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. आरोग्य सुविधांमध्ये रूग्णवाहिकांचे महत्व मोठे असल्याचे सांगत आरोग्याच्या दृष्टीने गोल्डन अवर्स म्हणून संबोधल्या जाणार्‍या अत्यंत निकडीच्या वेळी रूग्णवाहिका जीव वाचविण्याचे काम करतात असे सांगितले. त्यामुळे आमदार म्हात्रे यांनी पालिकेस उपलब्ध करून दिलेल्या या रूग्णवाहिका सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रूग्णसेवा देण्याच्या कामात उपयोगी ठरतील असे आयुक्तांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, वाहन विभागाचे उपआयुक्त योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे तसेच इतर मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.