Breaking News
भूधारकांना संपर्क साधण्याचे सिडकोचे आवाहन
नवी मुंबई ः शासनाने 10 जानेवारी 2013 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ति केली आहे. त्या अंतर्गत विकास आराखडयामध्ये नगररचना परियोजनेद्वारे नियोजित आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी आदेश देण्यात आले. नैना क्षेत्राचा नियोजित आणि सुव्यवस्थित विकास हा महाराष्ट्राच्या प्रगत आणि समृद्ध नागरीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
सध्या नैना क्षेत्रात 12 नगररचना परियोजना प्रस्तावित असून, त्यापैकी परियोजना क्रमांक 1 आणि 2 या अंतिम मंजुरी प्राप्त झालेल्या आहेत, तर परियोजना क्रमांक 3 ते 7 यांना प्राथमिक मान्यता मिळाली आहे. नगररचना परियोजना क्रमांक 8, 9, 10, 11 आणि 12 यांसाठी लवाद सुनावणीस माहे डिसेंबर 2024 पासून सुरुवात झाली असून आता अंतिम टप्यात पोचलेली आहे. या सुनावणी प्रक्रियेमध्ये ज्या जमीनमालकांची हजर राहण्यासंबंधीची नोटीस प्राप्त् झाली नाही, किंवा अन्य कारणास्तव सुनावणी झाली नाही, त्यांचेकरीता 30 मे 2025 पर्यंत सुनावणी देण्यास सिडको तर्फे मुदतवाढ देण्यात येत आहे.
नगररचना परियोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि जमीनमालकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सिडकोकडून व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तरी अशा जमीनधारकांनी कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत नैना कार्यालय, टॉवर नंबर 10, सिबीडी बेलापुर रेल्वे स्थानक संकुल, 7 वा मजला, सीबीडी- बेलापूर, नवी मुंबई येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे सिडको तर्फे सुचित करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai