नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2025
- 592
100 दिवसांच्या कार्यालयीन मुल्यमापनात बाजी
नवी मुंबई ः मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमेंतर्गत 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव, 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, 5 जिल्हाधिकारी, 5 पोलीस अधीक्षक,5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), 4 महापालिका आयुक्त, 3 पोलिस आयुक्त, 2 विभागीय आयुक्त आणि 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली. यामध्ये नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे व पनवेल पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना तृतीय क्रमांकाचे मानांकन जाहीर झाले आहे.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध 10 मुद्यांवर महापालिकेचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात दोन्ही महापालिकांना 100 पैकी 79.43 गुण मिळाले आहेत. नमुंमपाचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या उपक्रमातून कार्यालयीन सुुधारणेवर विशेष दिले होते. पालिकेचे संकेतस्थळ नुतनीकरण करुन ते वापरण्यास अधिक सुलभ व माहितीने परिपूर्ण करण्यावर भर देण्यात आला. जीआयजीडब्ल्यू अनुरुप संकेतस्थळ दिव्यांग स्नेही करण्यासोबतच त्यावर अत्यंत अद्ययावत अशी एआय चॅटबोट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत 68 पैकी 68 सेवा अधिसूचित करण्यात आल्या व नागरिकांच्या सुविधेसाठी त्या ऑनलाईनही उपलब्ध करुन देण्यात आल्या. या मोहीमेंतर्गत 2766 जुन्या व निरपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली असून 106 निरुपयोगी वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे व त्यामधील 32 वाहनांचा लिलावही पूर्ण झाला आहे. कार्यालयीन स्वच्छतेंतर्गंत 302369 अभिलेखाचे निंदणीकरण व वगकरण करण्यात आले असून 50299 मुदतबाह्य अभिलेख नष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे दोन्ही अभिलेख कक्षांचे नुतनीकरण करण्यात आले.
नागरिकांना महापालिका सेवांविषयी जाणविणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी प्रभावी ‘तक्रार निवारण प्रणाली’ कार्यान्वित करण्यात आली असून या अंतर्गत पीजी पोर्टल, आपले सरकार पोर्टल या शिवाय महापालिकेने स्वत: चे माय एनएमएमसी पोर्टल व ॲप विकसित केला आहे. या पोर्टलवर प्राप्त तक्रारींची तत्परतेने दखल घेण्यात येऊन त्याचे निराकरण करण्यात येत आहे व त्याबाबतची माहिती संबधित तक्रारदाराला कळविण्यात येत आहे. कार्यालयीन कामकाजामध्ये गतीमानता व पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने ई ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यावर भर देण्यात येत आहे. अगदी नव्या युगातील एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
कृती आराखड्यांतर्गत सुकर जीवनमानासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितांना नागरिक केंद्रीत सुविधांचे सुलभीकरण करण्यात आले असून मालमत्ता कर पध्दतीत कार्यालयीन प्रक्रियेतील नस्ती सादरीकरणाचे टप्पे कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कामाला गती आलेली आहे. मलामत्ता कराचे देयकही 6 महिन्यांऐवजी वार्षिक देयक वितरणावर भर देण्यात आला आहे. अशाचप्रकारे नर्सींग होम परवानगीतील कार्यालयीन कामकाज टप्पे कमी करण्याचा आणखी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येऊन वेळेच्या बचतीसोबत कामकाजात पारदर्शकता वाढली आहे. कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणेकरिता वेब आणि मोबाईल आधारित डेटाबेस असणारे ‘एनएमएमसी दक्ष’ हे वेब व मोबाईल बेस ॲप्लीकेशन उद्याने, पाणी पुरवठा, सांडपाणी, रस्ते व वीज अशा विविध सुविधांवर गुणवत्तापूर्ण नजर ठेवणार आहे.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाची दखल राज्य पातळीवर तृतीय क्रमांकाने घेण्यात आली असून ही नवी मुंबईकर नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.याबद्दल सर्वांचे अभिनंदन असून यापुढील काळात अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख प्रशासनासाठी सतर्क राहून वाटचाल केली जाईल. -आयुक्त डॉ. कैलास शिंदे
- हे ठरले सर्वोत्तम
निकालानुसार सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गटामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिदकारी रोहन घुगे तर सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त गटामध्ये उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्तम पोलीस आयुक्त म्हणून मिरा भाईंदरचे आयुक्त मधुकर पांडे यांची निवड झाली आहे. - कोकण परिक्षेत्र प्रथम
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आलेल्या अंतिम मुल्यमापनात विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र, हे राज्यात सर्वोत्तम परिक्षेत्र ठरले आहे. या सुधारणा अभियान काळात विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र कार्यालयाकडून www.konkanrange.mahapolice.gov.in हे सुलभरित्या वापरता येणारे संकेतस्थळ तयार करण्यात आले. सीइआयआर पोर्टल अंतर्गत परिक्षेत्रातुन हरविलेल्या एकूण 6448 मोबाईलपैकी 3308 मोबाईलचा शोध लावुन त्यापैकी 1038 मोबाईल प्रत्यक्षात हस्तगत करण्यात कोकण परिक्षेत्राने यश मिळवले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai