तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र
- by संजयकुमार सुर्वे
- May 02, 2025
- 627
पामबीच रेसिडेन्सीतील रहिवाशांनी भरले 100 कोटीनवी मुंबई : विकासक वाधवा बिल्डर्स यांनी नवी मुंबईतील पामबीच मार्गावर बांधलेल्या गृहसंकुलात मंजुर क्षेत्रापेक्षा वाढीव बांधकाम केल्याने तसेच मंजुरीशिवाय इमारत वापर सुरु केल्याने 66 कोटी रुपये भरण्याची नोटीस नवी मुंबई महापालिकेने दिली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सदर पैसे भरल्यानंतर सशर्त भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेश पालिकेला दिले होते. संबंधित सोसायटीने नवी मुंबई महापालिकेला 67 कोटीं तर सिडकोला 33 कोटी रुपयांचा भरणा केल्याने एक तपानंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भोगवटा प्रमाणपत्र मिळावे म्हणून नवी मुंबईतील प्रसिद्ध पामबीच रेसिडेन्सी गृहसंकुलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संबंधित गृहसंकुलात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झाल्याने आणि अग्निशमन विभागाच्या नियमांना अनुसरुन मोकळ्या असलेल्या संकुलातील जागा संबंधित सदनिकाधारकांनी गिळंकृत केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने दंडात्मक कारवाईची नोटीस संबंधित गृहसंकुलास दिली होती. परवानगीशिवाय इमारतीचा वापर सुरु केल्याने सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकुर यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयात 4 मार्च 2025 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने 66 कोटी रुपये संबंधित विकासक व सोसायटी यांना 14 मार्च पर्यंत भरण्याचे आदेश दिले होते. सदर पैसे भरल्यानंतर संबंधित गृहसंकुलास जनहित याचिका सापेक्ष भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेला दिले होते. पामबीच रेसिडेन्सीतील रहिवाशांनी एकत्र येऊन सदर पैसे जमा केले आणि ते नवी मुंबई महानगरपालिकेला भरले आहेत. भोगवटा प्रमाणपत्राशिवाय भुवापर व अतिरिक्त चटईक्षेत्राअंतर्गत एकुण 67 कोटींचा भरणा संबंधित संकुलाने महापालिकेकडे केल्याने या गृहसंकुलाला भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सिडकोकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित सोसायटीने सिडकोकडे बांधकाम विलंब शुल्कापोटी 33 कोटी भरले आहेत. महापालिकेनेही नवीन बांधकाम नियमावली अंतर्गत संबंधित गृहसंकुलास भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने तयारी सुरु केली असून हे प्रमाणपत्र दिल्यानंतर कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये याची दक्षता नगरविकास विभागाकडून घेण्यात येत आहे. दरम्यान, एक तपानंतर आणि खडतर परिश्रमानंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळणार असल्याने संबंधित संकुलातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
- पर्यावरण ना हरकत दाखला तिढा कायम
विकासकाने सदर पामबीच रेसिडेन्सी गृहप्रकल्पास घेतलेल्या पर्यावरण दाखल्याची मुदत यापुवच संपली आहे. त्यामुळे सोसायटीला अतिरिक्त चटईक्षेत्रासह नव्याने पर्यावरण दाखला घ्यावा लागणार आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगीशिवाय केलेल्या बांधकामाबाबत संबंधित विभाग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे