Breaking News
नवीमुंबई ः केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत सीबीडी बेलापूर सेक्टर-12 येथील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या 7.50 द.ल.लि. क्षमतेच्या टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्टचे काम पुर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आले आहे. या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करीत कामाला गती देऊन विहित मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सदर प्रकल्प केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेंतर्गत असून हे काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या पुनर्प्रक्रियाकृत सांडपाण्याचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर विभागातील उद्याने, ट्री बेल्ट व रस्ते दुभाजक आदींसाठी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक हौसिंग सोसायटयांमधील वाहने, उद्याने, सुशोभित जागा तसेच बांधकामे याकरिताही मागणीप्रमाणे हे पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरिता बेलापूर विभागात 23 कि.मी. लांबीची वाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत असून, त्यापैकी 21 कि.मी. वाहिनीचे काम पूर्ण झालेले आहे. प्रकल्पांतर्गत कामाची पाहणी करताना प्रकल्प उभारणीचे काम 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करुन ट्रायल रन सुरु करण्यात यावी व प्रकल्प दिलेल्या मुदतीत म्हणजेच 31 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
सदर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्टच्या प्रकल्पाच्या संपूर्ण जागेचे सिमांकन करुन प्रकल्पाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यासोबतच सदर प्रकल्पाच्या जागेवर रस्त्यालगत वृक्षरोपण करण्याचाही सूचना आयुक्तांनी दिल्या. या प्रकल्पांमुळे पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर पिण्या व्यतिरिक्त् कामांसाठी केला जाऊन पिण्यासाठी वापराच्या पाण्याची बचत होणार आहे. त्यादृष्टीने अमृत 2.0 योजने अंतर्गत निर्माण होणारा हा प्रकल्प नवी मुंबईच्या पर्यावरणशील भूमिकेला साजेसा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai