सोनेतारण कर्जं ठरताहेत बँकांची डोकेदुखी

मुंबईः बँकांसाठी सुरक्षित वाटणारी सोने तारण कर्जंच आता बँकांची डोकेदुखी बनायला लागली आहेत. गेल्या तिमाहीचा विचार करता बँकांची अनुत्पादक कर्जं वाढण्यात ही सुवर्णकर्जंच जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. सुवर्ण कर्जामध्ये नॉन-परफॉर्मिंग असेट (एनपीए) झपाट्याने वाढत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत, काही बँकांच्या एनपीएच्या 83 टक्के एनपीए केवळ सुवर्ण कर्जामुळे वाढलं आहे. सोन्याचा भाव जास्त असताना दिलेलं कर्ज सोन्याचा भाव कमी झाल्याने वसुलीत मोठे अडथळे आणत आहे. सोन्याचा भाव 56 हजार प्रतितोळा दरावरुन थेट 48 हजार रुपये प्रतितोळा झाला आहे. अशा परिस्थितीत, बहुसंख्य कर्जदार कर्जाची परतफेड करण्याऐवजी कर्ज थकवत आहेत.

आयसीआयसी बँकेचं 1,123 कोटी रुपयांचं सुवर्ण कर्ज एनपीएमध्ये गेलं आहे. आतापर्यंतच्या एप्रिल-जून तिमाहीच्या निकालांनुसार, आयसीआयसीआय फेडरल आणि कॅथोलिक सीरियन बँकेचं एनपीए वाढलं आहेत. यामध्ये सर्वात मोठा वाटा किरकोळ कर्जाचा आहे आणि त्यातही सुवर्ण कर्जाचा. गेल्या तिमाहीमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या एनपीएमध्ये 7,231 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापैकी 6,773 कोटी रुपये किरकोळ कर्जाचे आहेत. त्यापैकी सुवर्ण कर्ज 1,123 कोटी (16.6 टक्के) रुपये आहे. जून तिमाहीत फेडरल बँकेचा एनपीए 640 कोटी रुपयांनी वाढला. त्यात सुवर्ण कर्ज 86 कोटी रुपये (13.5टक्के) होतं. या कालावधीत, कॅथोलिक सीरियन बँक ऑफ साउथ इंडियाच्या 435 कोटींच्या नवीन एनपीएमध्ये एकट्या सुवर्ण कर्जाचे 361 कोटी रुपये (83 टक्के ) होते. इंडिया रेटिंग्ज आणि रिसर्च ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे प्रमुख प्रकाश अग्रवाल यांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत झालेली घसरण हे सोन्याच्या कर्जामुळे बँकांना होणार्या नुकसानीचं एक प्रमुख कारण आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये सुवर्ण कर्ज अडीच पटीने वाढलं. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर काही महिन्यांनी दुसरी लाट आली. यामुळे कर्जाचे हप्ते थांबू लागले; पण मागणी वाढतच गेली. गेल्या दोन वर्षांमध्ये सुवर्ण कर्ज वितरण अडीच पटींनी वाढलं. जून 2019 मध्ये एकूण 25 हजार 405 कोटी रुपये सुवर्ण कर्ज देण्यात आलं होतं. ते जून 2021 पर्यंत वाढून 62 हजार 221 कोटी रुपये झालं. जून 2019 मध्ये 25 हजार 405, जून 2020मध्ये  34 हजार 267 तर जून 2021 मध्ये 62 हजार 221 कोटी रुपये सुवर्ण कर्ज वितरित झालं. आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक संदीप बत्रा यांच्या मते, टाळेबंदीमुळे बहुतेक सुवर्ण कर्ज एप्रिल आणि मे मध्ये थकीत झालं. यापैकी बर्याच कर्जाची वसुली होण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमधली वसुली चांगली आहे. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.