Breaking News
ठाकरे गटाकडून सरकारी योजनांची पोलखोल : नागरिकांसोबत साधला जातोय संवाद
नवी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण शहरात गर्दीच्या ठिकाणी छोटेखानी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, नेरूळ आदी ठिकाणी या सभांचा झंझावात सुरू असून त्यात सरकारच्या योजनांची पोलखोल केली जात आहे. या सभांमध्ये नागरिक ही काही प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मन की बात कार्यक्रमाप्रमाणेच महाराष्ट्राभर नाक्यानाक्यांवर होऊ द्या चर्चा चे आयोजन करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सरकारी योजनांचे अपयश यावर चर्चा घडवून आणणे आहे. सरकारने सुरू केलेल्या अनेक योजना, आश्वासने यांचा उहापोह केला जात आहे. नागरिकांच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे आश्वासनाचे काय झाले? स्मार्ट सिटी, स्टार्ट अप इंडिया या योजनांची सध्या काय परिस्थिती आहे? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा घडवून आणली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईबद्दल नागरिकांशी चर्चा करण्यात येत आहे. शहरातील मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी दररोज पाच ते सात सभा घेण्यात येत आहेत.
वाशीमध्ये घेण्यात येणाऱ्या सभांना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा संघटिका रंजनाताई शिंत्रे, अतुल कुलकर्णी, आरती शिंदे, उपशहर प्रमुख राकेश मोरे, निलेश घाग, समीर बागवान तसेच स्थानिक कार्यकर्ते व नागरिकही उपस्थित राहत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai