Breaking News
महाविजय संकल्प दौऱ्यात बावनकुळे यांचा विश्वास
नवी मुंबई : देशातील 140 कोटी जनतेला नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी हवे असून तेच 2024 मध्ये पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशी येथे व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय 2024 अंतर्गत लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा संकल्प दौरा मंगळवारी झाला. या वेळी आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, ठाणे लोकसभा निवडणूकप्रमुख विनय सहस्रबुद्धे, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते. महाविजय अभियानाच्या सांगताप्रसंगी झालेल्या चौक सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जनतेला आवाहन करताना भारताला जगातील सर्वोत्तम देश बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदी असणे गरजेचे असल्याचे सांगितले. महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर करून त्यांचा सन्मान केला असल्याचे सांगितले. मोदी यांनी देश एकसंध करण्याचे काम केले. काश्मीरमधील 370 कलम हटवले. काश्मीरमध्ये कधीही तिरंगा फडकला नव्हता, त्या ठिकाणी तिरंगा फडकला. विरोधकांवर हल्लाबोल करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केवळ मोदी यांना विरोध करण्यासाठी देशातील 28 विरोधी पक्ष एकत्र आल्याचे सांगितले. जोपर्यंत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai