Breaking News
कालबध्द गतीमान कार्यवाहीचे कवण्याचे आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या बांधकाम पूर्ण झालेल्या विनावापर इमारती वापरात आणण्याच्या दृष्टीने जलद व कालबध्द कार्यवाही करावी तसेच मार्केटमधील गाळयांच्या व ओटल्यांच्या वितरणाची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी असे निर्देश देत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाळीपूर्वी या कार्यवाहीचा जागानिहाय अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्या.
महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सुरु असलेल्या कामांचा विस्तृत आढावा घेताना आयुक्तांनी प्रत्येक कामाची बारकाईने माहिती घेतली तसेच कामांना गती देण्याचे नेिर्देश दिले. मार्केटमधील जागा वाटप हा प्रलंबित विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने मार्केटचा विभागनिहाय आढावा घेताना संबधित नोंदणीकृत फेरीवाल्यांना जागा वाटप करण्यासोबतच रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले हटविण्याची मोहीमही अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे ज्या मार्केटची बांधकामे सुरु आहेत त्यांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावीत असेही आयुक्तांनी नेिर्देशित केले.अशाचप्रकारे विविध प्रयोजनासाठी महानगरपालिकेने बांधलेल्या इमारती वापरात येण्याच्या दृष्टीने कालबध्द व गतीमान कार्यवाही करण्याचे निर्देशित करीत आयुक्तांनी या कार्यवाहीच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा केला जात असल्याचे आढळल्यास संबधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट केले. 10 नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत असून तत्पूर्वी उद्यानांमधील खेळणी दुरुस्ती व आवश्यक कामे पूर्ण करावीत तसेच वंडर्स पार्क मधील आवश्यक कामे पूर्ण करुन घ्यावीत आणि शहरातील विविध पाच उदयानांमध्ये सुरु असलेल्या टॉयट्रेन त्यापूर्वी कार्यरत होतील व मुलांना त्याचा आनंद घेता येईल याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. 15 ऑक्टोबरपासून वंडर्स पार्क पावसाळयानंतर पुन: सुरु झाला असून तो संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
कोपरखैरणेमध्ये सेक्टर 14 व सेक्टर 16 येथील नागरी आरोग्य केंद्रांची बांधकामे जलद पूर्ण करावीत असे अभियांत्रिकी विभागाला सूचित करतानाच आयुक्तांनी बांधकाम पूर्ण झाल्यावर ही केंद्रे लगेच कार्यान्वित होतील अशा प्रकारे आरोग्य विभागाने मनुष्यबळाचे व औषधसाठा आणि आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करुन ठेवावे अशा सूचना यावेळी दिल्या. त्याचप्रकारे कोपरखैरणे व दिघा येथील रुग्णालयांची आणि जुईनगर शिरवणे येथील पशुवैदयकीय रुग्णालयाची बांधकामेही गतीमानतेने व गुणवत्ता राखून पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशीत केले. सायन्स पार्क, स्वच्छता पार्क, वाशी बस डेपो आणि सेक्टर 26 वाशी येथील एनएमएमटी संकुलांची बांधकामे, मोरबे सोलार पॅनल प्रकल्प, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, यांत्रिकी वाहनाव्दारे सफाई, सेन्ट्रल पार्क येथील तरणतलाव अशा विविध बाबींचा आढावा घेत आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. तसेच दिवाळीच्या सुट्टीत शाळा इमारतीत काही स्थापत्य दुरुस्ती कामे करावयाची असल्यास ती शिक्षण विभागाने अभियांत्रिकी विभागाशी समन्वय साधून करुन घ्यावीत असे आयुक्तांनी सूचित केले.
पार्कींग धोरण हा नवी मुंबई शहर नियोजनातील अत्यंत महत्वाचा विषय असून त्याच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी वाहतूक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह त्वरित बैठक बोलावून धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी असे आयुक्तांमार्फत आदेशित करण्यात आले. या अनुषंगाने सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथे बांधण्यात येत असलेल्या मल्टीस्टोरेज वाहनतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन तो कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जलद कार्यवाही करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. विदयार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता त्यांना व्यक्तिगतरित्या समाजविकास विभागात अर्ज दाखल करावा लागतो. त्याऐवजी शाळांमार्फतच विदयार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज शाळांकडून साक्षांकित करुन संकलित केले तर अधिक सोयीचे होईल असे स्पष्ट करीत सन 2023-24 याकरीता अशा प्रकारची कार्यप्रणाली राबविण्याबाबत प्रक्रियेची तयारी करावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी सीसीटिव्ही प्रकल्प तसेच लिडार सर्व्हेक्षण यांचाही आढावा घेत त्यामधील अडचणी दूर करुन ते जलद पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देशीत केले. या बैठकीत दिलेल्या निर्देशांवर केलेल्या कार्यवाहीचा प्रगती अहवाल घेऊन पुढील बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai