Breaking News
पालिकेची विशेष स्वच्छता मोहीम
नवी मुंबई ः दिवाळीमध्ये वातावरणात उत्साह, चैतन्य जाणवत असला तरी प्रदुषणात आणि कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसते. त्यामुळे स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या अभियानामध्ये स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. 13 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी आठही विभागातून तब्बल 27 टन 700 किलो कचरा 375 सफाई कर्मचाऱ्यांनी जमा केला.
दिवाळीच्या दिवसात मोठया प्रमाणात फटाकेही वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कचऱ्यात नेहमीपेक्षा अधिक भर पडते. त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण जास्त असते. लक्ष्मीपूजनाच्या रात्री पालिका परिसरात बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पहाटे 1 ते 5 वाजेपर्यंत स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष स्वच्छता मोहीमेकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 375 सफाई कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक केली होती. 10 रिफ्युज कॉम्पॅक्टर वहाने आणि 13 मिनी टिपर वहाने यांच्या माध्यमातून या स्वच्छता मोहीमेत गोळा करण्यात आलेला प्रामुख्याने फटाक्यांच्या कचऱ्यासह इतर कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी त्वरित वाहून नेण्यात आला. शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे अशा नागरिकांची गजबज असलेल्या स्थळांवर पहाटे 1 ते 5 या कालावधीत राबविलेल्या या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले. खादयपदार्थ यांचा 9 टन 600 किलो ओला कचरा तसेच विशेषत्वाने फटाके,कागद, पुठ्ठे, कापड यांचा 18 टन 100 किलो सुका कचरा गोळा करून एकुण 27 टन 700 किलो कचरा स्वतंत्र वाहनांमध्ये तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत ही विशेष साफसफाई मोहीम राबविल्याने सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांनी स्वच्छ रस्ते, चौक पाहून या महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai