
42 दिवसांत उभारले बहुमजली वाहनतळ
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2025
- 82
गुणवत्तेशी तडजोड न करता बांधकाम केल्याचा सिडकोचा दावा
नवी मुंबई ः सिडकोतर्फे मिशन 45 अंतर्गत नवी मुंबईतील खारकोपर येथील सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे (मल्टि-लेव्हल कार पार्किंगचे) बांधकाम विक्रमी 42 दिवसांत पूर्ण करण्यात आले. शुक्रवारी सिडकोतील अधिकाऱ्यांनी या कामाचे यश साजरे केले. गुणवत्तेशी तडजोड न करता, वेगाने परंतु सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन करण्यात हे बांधकाम केल्याचा दावा सिडकोने केला आहे.
सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 67,000 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये गृहनिर्माण योजनेतील इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू असून यातील सदनिका टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मिशन-45 अंतर्गत सदर महागृहनिर्माण योजनेच्या पॅकेज-4 अंतर्गत खारकोपर येथील भूखंड क्र. 3 वर बहुमजली वाहनतळ उभारण्यात आले आहे. वाहनतळाचे काम 04 मार्च 2025 रोजी सुरू होऊन 17 एप्रिल 2025 रोजी पूर्ण झाले. नियोजित वेळापत्रकाच्या 3 दिवस आधी म्हणजे केवळ 42 दिवसांत या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अशाप्रकारच्या पारंपरिक बांधकामाकरिता लागणारा 6 महिन्यांचा कालावधी विचारात घेता साडे चार महिन्यांच्या कालावधीची बचत झाली आहे. प्रगत व जगप्रसिद्ध प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत अल्प कालावधीमध्ये उभारण्यात आली आहे. या बांधकामात एकूण 2,212 प्रीकास्ट घटकांचा वापर करण्यात आला होता. प्लिंथ टू टेरेस आरसीसी प्रकारातील हे बांधकाम आहे.
तळ + 6 मजले अशी या इमारतीची रचना असून 6 मजले हे वाहनतळ म्हणून व तळ मजला हा समाज केंद्राकरिता आहे. वाहनतळाचे बांधीव क्षेत्र 1.43 लाख चौ.फुट असून 365 चार चाकींकरिता वाहनतळ नियोजित आहे. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे व जागेच्या अभावामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, अशा प्रकारच्या बहुमजली वाहनतळामुळे सिडकोच्या गृहसंकुलांतील रहिवशांना आपल्या वाहनांचे पार्किंग करणे सुलभ होणार आहे.
सिडकोची गृहसंकुले ही सर्वार्थाने रहिवाशांचे जीवनमान उंचावणारी आहेत. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या गृहसंकुलांच्या परिसरामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या दरातील सिडकोच्या या गृहसंकुलांतर्गत खासगी विकासकांच्या तोडीस तोड आधुनिक सुखसोयी पुरविण्यात येतात. बहुमजली वाहनतळ उभारून गृहसंकुलांना अधिक परिपूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल सिडकोने उचलले आहे. सिडकोचे हे यश साजरे करण्यासाठी शुक्रवार, दि. 25 एप्रिल 2025 रोजी विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, शीला करुणाकरन, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), सिडको, प्रभाकर फुलारी, अतिरिक्त मुख्य अभियंता, सिडको यांसह सिडकोतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तडजोड न करता गुणवत्ता, विलंब न करता गती, आणि सर्वांपेक्षा महत्वाची सुरक्षा हीच आमच्या पायाभूत सुविधांच्या बांधणीमागील प्रेरणा आहेत. ‘मिशन 45’ अंतर्गत करण्यात आलेले सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे (मल्टि-लेव्हल कार पार्किंगचे) बांधकाम हे विकासातील नवीन मानदंड स्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, जे आपल्या शहरांचे भविष्य अधिक उज्वल घडवण्यासाठी योगदान देते. -विजय सिंघल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai