इक्विटेबल-सिंपल मॉर्गेजचे मुद्रांक शुल्क समान

नोंदणी करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार

मुंबई ः इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज (साधे गहाणखत) या दोन्हींवर आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी आता एकसारखी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे यापुढे सामान्य नागरीक, झोपडपट्टीधारक, शेतकरी तसेच अन्य असंघटीत घटक ज्यांच्याकडे नोंदणीकृत दस्त नाही परंतू, 7/12 किंवा मिळकत प्रमाणपत्राचा पुरावा आहे, अशा घटकाला त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेच्या टायटल अर्थात पुराव्याच्या आधारावर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.

बँकांशी संबधित दस्तांवर मुद्रांक शुल्कामधील तफावतीमुळे होणार्‍या मुद्रांक शुल्क चुकवेगिरीस आळा घालण्याच्या उद्देशाने बँकांशी संबंधित डिपॉझिट ऑफ टायटल किंवा इक्विटेबल मॉर्गेज दस्तांवर आकारण्यात येणार्‍या मुद्रांक शुल्काचा दर 0.2 टक्के ऐवजी 0.3 टक्के, तर गहाण खतामध्ये समाविष्ट असलेल्या मालमत्तेचा कब्जा दिलेला नसेल अशा साध्या गहाण खताच्या दस्तावर आकारण्यात येणारा मुद्रांक शुल्क दरदेखील 0.5 टक्के ऐवजी 0.3 टक्के असे मुद्रांक शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. यामुळे बँकांशी संबंधित दस्तांवर एकसमान मुद्रांक शुल्क आकारणी तसेच, दस्तांच्या ऑनलाइन पद्धतीने नोंदणीसाठी किंवा नोटीसच्या ऑनलाइन फायलिंगच्या नोंदणीसाठी पंधरा हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी तसेच अन्य असघंटीत घटकांना कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे. गहाणखताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर होतो. परंतु त्यासाठी वेगवेगळी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. इक्विटेबल मॉर्गेजसाठी सध्या 0.2 टक्के, तर सिंपल मॉर्गेजसाठी 0.3 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. अनेकदा त्यामुळे नागरिकांना गोंधळ होतो. त्यातून वारंवार लोकांना सब रजिस्टार कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.