सर्जनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2025
- 341
वेव्हज परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
मुंबई : व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सर्जनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली सर्जनशीलता प्रत्येकाने आपल्या परीने जोपासावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट 2025 (व्हेव्ज) चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ मधील विजेत्यांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला संगीत, नाटकासह विविध कला प्रकारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. तो अधिक वृद्धिंगत करण्यासाठी नव्या पिढीतील सर्जनशीलतेला नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी विविध संधी उपलब्ध करून देत प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपले शरीर कोणत्याही अपायकारक बाह्य गोष्टीला स्वीकारत नाही, त्याचप्रमाणे माणसाची सर्जनशीलता वाईट गोष्टींना आपल्या मनामध्ये टिकू देत नाही. आपले मन उल्हसित ठेवण्याची महत्त्वाची भूमिका सृजनशीलता पार पडत असते. संगणकावर आपल्या बोटांचा वापर करणारा संगणक अभियंता थकतो तर त्याचवेळी एखादा वयोवृद्ध सतारवादक त्या संगणक अभियंत्याच्या तुलनेत जास्त प्रसन्न, उल्हासित राहतो. हा फरक सर्जनशीलतेमुळे पहावयास मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील कला, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत जोपासली पाहिजे. भारत सर्व क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. त्याच धतवर सर्जनशीलतेच्या क्षेत्रात ‘वेव्हज’च्या माध्यमातून पुढे आलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना यशाचा मोठा पल्ला गाठतील, असे सांगून प्रधानमंत्री मोदी यांनी या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तत्पूव प्रधानमंत्री मोदी यांनी ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’मधील विजेत्यांच्या दालनांना भेट देऊन त्यांच्या संकल्पनांची माहिती घेतली.
वेव्हज् 2025 च्या पहिल्या दिवशी “भारतीय माध्यम आणि मनोरंजन 100 : माध्यम आणि मनोरंजनाच्या भविष्याची पुनर्कल्पना” या अंतर्गत लक्षवेधी परिसंवाद झाला. या सत्रात उद्योगातील प्रमुख व्यक्तींनी 2047 च्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या भारताचा विकास आणि पुढील वाटचालीबाबत आपले विचार मांडले. बिझनेस स्टँडर्डच्या स्तंभलेखिका वनिता कोहली खांडेकर यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले. वेव्हज मध्ये “दृकश्राव्य कलाकार आणि आशय निर्मात्यांसाठी आयपी आणि कॉपीराईटची भूमिका” यावर परिसंवाद झाला. डिजिटल युगात निर्मात्यांना सक्षम बनवण्यात बौद्धिक संपदा (आयपी) अधिकारांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी जागतिक मनोरंजन, कायदा आणि सर्जनशील उद्योगांमधील प्रभावशाली व्यक्तींनी या सत्रात सहभाग नोंदवला. या पॅनेलने कायद्याशी संबंधित बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले आणि विशेषत: कलाकार आणि आशय निर्माते, ज्यांचे काम अनधिकृत वापर आणि शोषणासाठी असुरक्षित आहे, त्यांच्यासाठी आयपी अधिकारांबद्दल अधिक जागरूकता आणि संरक्षणाची तातडीची गरज अधोरेखित केली. पॅनेलमध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे (डब्ल्यूआयपीओ) महासंचालकडॅरेन टांग यांनी धोरणात्मक चौकटी आणि जगभरातील कलाकारांसाठी संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी डब्ल्यूआयपीओच्या प्रयत्नांबाबत जागतिक दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, गेल्या 5 दशकांमधील भारताचा बौद्धिक संपदाविषयक प्रवास असामान्य आहे आणि त्याची सर्जनशील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आयपी सर्व देशांसाठी रोजगार, विकास आणि नवोन्मेषासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते त्यामुळे जागतिक आयपी परिसंस्थेत परिवर्तन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. डब्ल्यूआयपीओच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या डेटा मॉडेलबद्दल बोलताना ते म्हणाले की ते धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि त्याच्या सदस्य देशांच्या निर्मात्यांना सर्जनशील अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी चांगली मोजमाप प्रणाली शोधण्यास मदत करत आहे.
- मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’
भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने 400 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मंत्री वैष्णव म्हणाले, ‘आयआयसीटी’च्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. - चार दिवसांत 100 सत्रे
या परिषदेस जगभरातून धोरणकर्ते, उद्योग नेते आणि 75 देशांतील निर्माते सहभागी झाले असून पुढील चार दिवसांत 100 सत्रे विविध स्वरूपात पार पडणार आहेत. सर्जनशील समुदाय क्रिएट इन इंडिया स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून 32 क्षेत्रांमध्ये ह्या स्पर्धा झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai