
आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का?
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 23, 2022
- 580
शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वआर आपली भुमिका मांडल्यानंतर बंडखोर आमदारांनी त्यावर पत्र लिहिून प्रतिक्रिया दिली आहे.औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. ‘वर्षा’चं दार आमच्यासाठी कधी उघडलंच नाही अशी खंत व्यक्त करताना आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? असा सवाल विचारला आहे.
पत्रातील मजकुर -
काल वर्षा बंगल्याची दारं खर्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणार्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणार्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.
तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणार्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? हा आमचा सवाल आहे? हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची ही सर्व गार्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.
हिंदुत्व, अयोध्या राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही? साहेब, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.
या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिदुत्व जपणार्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai