Breaking News
सिडको भवनवर धडक देऊन निषेध; हरकतींसाठी 15 दिवसांची मुदतवाढ
उरण ः तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या गावकर्यांनी सिडकोच्या नव्या शहराच्या विकासासाठी नव्याने जमीन संपादित करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. या संदर्भात 12 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून हरकती व सूचना मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याविषयी हरकती नोंदवणार्या शेकडो शेतकर्यांनी गुरुवारी सिडको भवनावर जाउन यानिर्णयाचा निषेध करत हरकती नोंदविल्या. तसेच दोन तास सिडको मुख्यालयाचे प्रवेशद्वार रोखले.
पाच ग्रामपंचायतींच्या 100 हून अधिक प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली आणि प्रस्तावित भूसंपादनाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. संपादित करायच्या जमिनी प्रादेशिक पार्किंग झोन (आरपीझेड) म्हणून आरक्षित असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून या जमिनी का संपादित करायच्या असा सवाल त्यांनी केला. उरण तालुक्यातील बोकडविरा, पागोटे, चाणजे, नागाव, फुंदे, रानवड आणि नवघर या महसुली गावांमध्ये प्रस्तावित भूसंपादन केले जाणार आहे. राज्य सरकार किंवा सिडकोने या जमिनी कोणत्या उद्देशाने संपादित केल्या जाणार आहेत, याचा उल्लेख केला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आम्ही लोकशाही व्यवस्थेत राहतो आणि भूसंपादनाचा निर्णय घेण्यापूर्वी, गावकर्यांचा सल्ला घेतला गेला पाहिज असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सिडको प्रशासनाच्या या निर्णया विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
अधिसूचनेनुसार, ग्रामस्थांनी 27 ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवायच्या होत्या. यावेळी सिडकोच्या भूसंपादन विभागात 1500 पेक्षा अधिक शेतकर्यांनी वैयक्तिक हरकती नोंदविल्या. गावठाण हक्क परिषद व चाणजे शेतकरी समितीने केलेल्या मागणी नुसार सिडको भूसंपादन व भूमापन विभागाने शेतकर्यांना हरकती नोंदविण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai