
दिघा व घणसोलीतील विकास कामांची आयुक्तांकडून पाहणी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 12, 2023
- 270
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेली नागरी विकास कामे गुणवत्तापूर्ण असावीत हा पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचा कटाक्ष असून यादृष्टीने आयुक्तांनी दिघा परिसरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
दिघा परिसरातील सांडपाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी मलनि:स्सारण वाहिन्या टाकल्या जात असून साधारणत: 20 कि.मी. कामापैकी 8 कि.मी. काम झाले असून पुढील काम प्रगतीपथावर आहे. टिटिसी एमआयडीसीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मलनि:स्सारण वाहिन्यांच्या कामांची आयुक्तांनी पाहणी करत या कामाला गती देण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या. दिघा परिसरात गणपतीपाडा, ईश्वरनगर, विष्णु नगर, बिंदूमाधव नगर, दुर्गानगर, गणेश नगर, पंढरी नगर, सुभाष नगर व इतर भागांमध्ये मुख्य रस्त्यांवर मलनि:स्सारण वाहिन्या टाकल्या जात असून यामुळे दिघा भागातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक चांगले होणार आहे. सदर कामांमध्ये गुणवत्ता राखण्याची व संबंधित अभियंत्यांनी या कामांची नियमित पाहणी करण्याचेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. दिघा परिसरातील मलनि:स्सारण व्यवस्थापन सक्षमीकरणाच्या दृष्टीने सिव्हेज पंपहाऊस बांधण्यासाठीच्या नियोजित जागेचीही आयुक्तांनी पाहणी करत भूखंडाविषयीची सद्यस्थिती आयुक्तांनी जाणून घेतली.
इलठणपाडा धरण व परिसराचीही पाहणी
दिघा विभागात इलठणपाडा येथे ब्रिटीशकालीन धरण असून आयुक्तांनी सदर धरण परिसराला भेट देऊन धरणाची व परिसराची पाहणी केली. याठिकाणी वन विभागामार्फत काही प्रमाणात काम झाले असून या भागात पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने वन विभाग, रेल्वे आणि पालिका यांच्यामार्फत संयुक्तपणे काही काम करता येईल काय या अनुषंगानेही आयुक्तांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे पावसाळी कालावधीत हे धरण संपूर्ण भरून पाणी त्यावरून वाहू लागते. हे पाणी योग्य रितीने पश्चिमेकडील खाडीपर्यंत वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्यामध्ये अडथळा असू नये यादृष्टीनेही आयुक्तांनी पाहणी केली व आगामी पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे अडचण जाणवू नये यासाठी आधीच काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी विभाग अधिकारी यांना दिल्या.
घणसोली सेंट्रल पार्कमधील तरण तलाव कार्यान्वित करण्याचे निर्देश
नवी मुंबई महानगरपालिकेने घणसोली येथे निसर्गाच्या पंचतत्वांवर आधारित सेंट्रल पार्क विकसित केले असून या पार्कमध्ये नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांची पाहणी करताना आयुक्तांनी येथील सुविधा सुस्थितीत रहाव्यात व नागरिकांना याचा पूर्ण उपयोग घेता यावा यादृष्टीने काही सुविधांमध्ये सुधारणा सुचविल्या. विशेषत्वाने येथील तरण तलाव कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. सेंट्रल पार्कच्या सभोवताली सकाळी व संध्याकाळी नागरिक मोठ्या प्रमाणावर जॉगींगसाठी येत असतात. तेथील जॉगींग ट्रॅकही सुव्यवस्थित राखण्याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेली कामे गुणवत्तपूर्ण राखण्यासोबतच त्यांची देखभाल व दुरुस्तीही वेळच्या वेळी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने लक्ष देण्याचे काटेकोर निर्देश आयुक्तांनी दौऱ्यामध्ये दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai