कोरोनाच्या मुकाबल्यासाठी पालिका सज्ज

नागरिकांना सहकार्याचे आवाहन ; निष्काळजीपणा केल्यास कारवाईचा इशारा

नवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभुमीवर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढविली असून अधिकारी, कर्मचार्‍यांनाही दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. तसेच जे निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

पालिकेने केलेल्या उपाययोजना, जनजागृती, दिलेल्या योग्य आरोग्य सेवा यामुळे नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास मदत झाली आहे. आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, नोडल अधिकारी, उपायुक्त, विभाग अधिकारी यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘मिशन-ब्रेक द चेन’ काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्ण वेळेत शोधण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. शहरातील 23 केंद्रे, एपीएमसी व एमआयडीसीमधील विशेष केंद्रे अधिक कृतिशील करण्याच्या सूचना केल्या आहेत. फेरीवाले, दुकानदार, रिक्षाचालक, सार्वजनिक वाहनांचे चालक अशा मोठ्या प्रमाणात लोकसंपर्कात येणार्‍यांची प्राधान्याचे तपासणी केली जाणार आहे. रुग्णांच्या संपर्कातील 24 व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी केली जात असून, त्यामध्ये सातत्य ठेवले जाणार आहे. महानगरपालिकेने रुग्णालय यंत्रणा सक्षम केली आहे. पुरेसा औषधसाठाही उपलब्ध केला आहे. ज्या सेंटरमधील प्रवेश थांबिवले आहेत, ती रुग्णालयेही पुन्हा तत्काळ सुरू करता येतील अशी तयारी केली आहे. कन्टेनमेंट झोनचे प्रभावी व काटेकोरपणे व्यवस्थापन केले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट जास्त हानिकारक असेल हे गृहीत धरून मास्कचा नियमित वापर करण्यात यावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांसह नियुक्त केलेल्या दक्षता पथकांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.