पालिका निवडणुकीसंदर्भात सरकारची भूमिका वादात

तिजोरी खाली करण्याचा डाव; रामचंद्र घरत यांचा आरोप

नवी मुंबई ः राज्यात गेल्या काही महिन्यात 18 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या असून देशात पाच राज्यातील निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे. असे असताना नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी का घेत नाही असा सवाल आता विरोधक विचारू लागले आहेत. कोरोना तर बहाणा असून पालिकेची तिजोरी खाली करण्याचा डाव असल्याचा घणाघाती आरोप नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना केला आहे. याबाबत आपण राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार पालिकेने हाती घेतलेल्या कामांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्च 2020 मध्ये कोरोना संक्रमण होऊन लॉकडाऊन लागल्याने नवी मुंबई महापालिकेची एप्रिल मध्ये होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. मे 2020 पासून नवी मुंबई महानगरपालिकेवर महाराष्ट्र सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली असून आयुक्तांनाच प्रशासक नेमून त्यांच्या मार्फत पालिकेचा कारभार चालवला जात आहे. प्रशासकाची नियुक्ती 30 एप्रिलपर्यंत असताना त्याआधी निवडणूक होऊन जनप्रतिनिधींच्या हाती सत्ता देणे गरजेचे होते असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात राज्यातील 18000 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या असून आता देशात पाच राज्यातील निवडणूका सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर पासूनच जर पालिकेची निवडणूक प्रक्रिया राबवली असती तर कोरोना काळातही निवडणूका वेळेत घेणे शक्य होते, परंतु महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल आणि पुन्हा नवी मुंबई पालिकेचा कारभार गणेश नाईक यांच्या हाती जाईल म्हणून महाविकास आघाडी निवडणूक घेण्यास भीत असल्याचा घणाघाती आरोप रामचंद्र घरत यांनी केला.

घरत एवढ्यावर थांबले नसून पालिकेच्या 2700 कोटींच्या ठेवीवर महाविकास आघाडीचा डोळा असल्याचे सांगत  शेकडो कोटींची कामे प्रशासकाच्या माध्यमातून हाती घेण्यात येऊन पालिकेची तिजोरी खाली करण्याचा हा सरकारचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना हे फक्त निमित्त असून कोट्यवधींच्या कामामागील अर्थकारण हेच नवी मुंबई महापालिकेची निवडणूक न घेण्यामागील सरकारचे राजकारण असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा सर्वे झाला असून नवी मुंबईवर बीजेपीची सत्ता येणार असल्याचे त्यांना कळल्याने हा रडीचा डाव ते खेळत असल्याचे ते म्हणाले. याबाबत आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचे सांगून लवकरच पालिका निवडणुकांसंदर्भात राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून प्रशासकामार्फत हाती घेतलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नवी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येणार असल्याने महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे. 2700 कोटींच्या ठेवींवर सरकारची नजर असून जास्तीत जास्त कामे प्रशासकाच्या माध्यमातून काढली जात आहेत. अर्थकारण हेच निवडणुक टाळण्याचे कारण आहे.  
- रामचंद्र घरत, जिल्हाप्रमुख, भाजप