Breaking News
मुंबई : जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशातल्या घरांची विक्री नऊ टक्क्यांनी वाढली आहे. देशातल्या आठ मोठ्या शहरांमध्ये 78 हजार 627 घरांची विक्री झाली आहे, असं ‘नाइट फ्रँक इंडिया’ने जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. देशभरात ही स्थिती असताना मुंबईत मात्र उलटी स्थिती आहे. पुण्यातही तेच झालं आहे. मुंबईतल्या घरांची विक्री नऊ टक्क्यांनी तर पुण्यातली विक्री 25 टक्क्यांनी घटली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. असं असलं तरी बँका स्वस्तात कर्ज द्यायला तयार असल्याने घरांच्या खरेदीला प्रतिसाद मिळाला आहे.
मागील आठवड्यात ‘ऍनारॉक’ आणि ‘प्रॉपटायगर’ या संस्थांनी गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित काही डाटा जाहीर केला होता. सात शहरांतील घरांची विक्री 71 टक्क्यांनी वाढून 99 हजार 550 वर गेल्याचे ‘ऍनारॉक’ने म्हटलं होतं. ‘प्रॉपटायगर’ने आठ मोठ्या शहरांतील वाढ सात टक्के आणि घरांची विक्री 70 हजार 623 ने वर गेल्याचं म्हटलं होतं. ‘नाइट फ्रँक’च्या अहवालानुसार, देशातल्या महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये 2022 च्या पहिल्या तिमाहिमध्ये 78, 627 घरांची विक्री झाली. वार्षिक आधारावर ती नऊ टक्क्यांनी अधिक आहे. हा आकडा तिसर्या तिमाहीत कोविडपूर्व काळातील घरांच्या विक्रीपेक्षा अधिक राहिला आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 21 हजार 548 घरांची विक्री झाली. इथली वृद्धी मात्र वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी घसरली, तर पुण्यातील घरांची विक्री 25 टक्क्यांनी घसरली. पुण्यात दहा हजार 305 घरे विकली गेली. ही मोठी घसरण आहे. कारण घरांची विक्री वाढावी, यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली; मात्र त्यानंतरही ही घसरण झाली आहे. बांधकामाच्या एकूण खर्चात 67 टक्के कच्चा माल, मजुरी 28 टक्के आणि इंधनाचा खर्च 5 टक्के याचा समावेश असतो, असे ‘रिअल इस्टेट कंपनी कॉलिरस’च्या एका अहवालातून समोर आले आहे. बांधकामाला लागणारा सर्वच कच्चा माल महाग झाला आहे. वर्षभरात बांधकामाच्या खर्चात जवळपास दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गृहनिर्माण बांधकामाचा खर्च दोन हजार 60 रुपये प्रतिचौरस फूट होता, तो आता दोन हजार तीनशे रुपये झाला आहे. दुसरीकडे औद्योगिक बांधकामाचा खर्चदेखील वाढला आहे. कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आली होती. आता संपूर्ण निर्बंध उठवल्यानंतरही बांधकाम क्षेत्रात मागणी वाढली नाही. तरीही बिल्डरांनी घरांच्या किंमती वाढवल्या आहेत. देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत घरांच्या विक्रीत सात टक्के वाढ झाली आहे. याच कालावधीत घरांच्या किंमतीतही सरासरी सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai