Breaking News
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील 9 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी, जस्पिंदर नरुला, रानेद्र भानू मजुमदार, वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी व चैत्राम पवार यांना पर्यावरण आणि वनसंवर्धन, सामाजिक क्षेत्र, मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते.
सात मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार
भारताच्या बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व अरुंधति भट्टाचार्य यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या व्यवसायातील आणि सामाजिक योगदानाची दखल घेत आज त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन कुमार गोएंका यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑटोमोटिव्ह आणि शेती उपकरणे व्यवसायात मोठी प्रगती झाली.
सोलापूरचे सुपूत्र आणि अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पक्षी, प्राणी आणि वन संसाधनांवर विपुल लेखन केले आहे. सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेल्या कामथ यांनी तेलरंग, पानी रंग, ऐक्रेलिक आणि सॉफ्ट पेस्टल माध्यमांतून उल्लेखनीय कलाकृती साकारल्या आहेत. त्यांनी पौराणिक, ऐतिहासिक विषयांवर आधारित अनेक व्यक्तिपरक चित्रे तयार केली आहेत. त्यांच्या ‘माय वाइफ’ या चित्रासाठी त्यांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेकडून ड्रेपर ग्रँड पुरस्कारही मिळाला आहे. प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका जसपिंदर नरूला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी, पंजाबी सिनेमा तसेच सूफी, गुरबानी आणि भक्ति संगीत क्षेत्रात त्यांच्या गायनाने अमीट ठसा उमटवला आहे. भारतीय बांसुरी वादन क्षेत्रातील प्रतिष्ठित कलाकार पं. रानेद्र भानू मजुमदार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी बांसुरी वादनाला भारतासह संपूर्ण जगभर नवी ओळख दिली आहे. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावाचे नंदनवन करणारे पर्यावरण संवर्धक चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली तीन दशके त्यांनी वनवासी समाजाच्या सहभागातून जंगल संरक्षण, जलसंधारण, वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले आहे. वनबंधू म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवार यांना यापूव महाराष्ट्र वनभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बारीपाडा गावाने सर्वांगीण प्रगती केली असून महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात केली जात आहे. आजच्या कार्यक्रमात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार यादीत 139 जणांची निवड करण्यात आली आहे, त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai