Breaking News
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
मुंबई : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग आदींसह बंदर आणि विमानतळ विकासाच्या कामांचा समावेश आहे. या संपूर्ण विकासाच्या इकोसिस्टीममुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
हॉटेल फोर सीजन येथे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट - 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सीएनबीसी टीव्ही 18 वृत्तवाहिनीच्या संपादक शिरीन भान यांनी घेतली. फडणवीस म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गतीने सुरू आहे. या ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. सागरी किनारा रस्ता, अटल सेतू, विविध मेट्रो मार्गांची कामे ही त्यातली ठळक उदाहरणे आहेत. या सर्व विकास कामांमुळे मुंबईत गुंतवणूक 50 बिलियन डॉलरपर्यंत जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणारे आहेत. यासोबतच पुणे येथील नवीन विमानतळ, शिड, नागपूर विमानतळाच विकास, नदी जोड प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सागरी किनारा रस्ता विरारपर्यंत वाढविण्यात येत आहे. वाढवण बंदर हे सध्या अस्तित्वात असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टपेक्षा तीन पट मोठे आहे. या बंदराला प्रवेश नियंत्रित असलेल्या महामार्गाने नाशिकपर्यंत जोडण्यात येऊन पुढे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. वाढवण बंदराजवळ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच या परिसरात चौथ्या मुंबईचेही निर्माण करण्यात येणार आहे. ‘समृद्धी महामार्ग’ नंतर राज्यात नागपूर ते गोवा ‘शक्तिपीठ महामार्ग’ निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे नेहमी भविष्यासाठी रेडी असणारे राज्य आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुंतवणूकदारांना सोयी सुविधा मिळण्यासाठी व गतीने गुंतवणूक येण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ मध्ये राज्य मोठी झेप घेत आहे. 2029 मध्ये महाराष्ट्र इज ऑफ डुईंग बिजनेस मध्ये पहिला असेल. गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी मैत्री पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून सिंगल विंडो सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना सिंगल विंडो सिस्टीममुळे उद्योग स्थापन करण्यास सुलभता येत आहे.
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ तसेच ‘अटल सेतू’ यामुळे तिसरी मुंबई निर्माण होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या भागात नवीन एज्युसिटी निर्माण करण्यात येत आहे. जगभरातील विविध नामांकित विद्यापीठे या परिसरात शैक्षणिक दालन उघडणार आहेत. त्यासोबतच हेल्थ सिटी, इनोवेशनन सिटीचे निर्माणही करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे कृषी क्षेत्राचे 16000 मेगावॅटची वीज पूर्णपणे सौर उर्जेवर निर्माण करण्यात येणार आहे. सध्या या क्षेत्रात 21 टक्के राज्याची क्षमता असून 2030 पर्यंत ती 52 टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai